आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Tejaswini Sonawane, Divya Marathi

अपघातग्रस्त तेजस्विनीची चार तास फरपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजस्विनी सोनवणे - Divya Marathi
तेजस्विनी सोनवणे

जळगाव - अजिंठा चौफुलीवर मंगळवारी सकाळी 6.40 वाजता एका भरधाव ट्रकने तेजस्विनी शांताराम सोनवणे या नववीत शिकणार्‍या आणि सायकलने शाळेत जायला निघालेल्या मुलीला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्याच अवस्थेत तिला घेऊन तिच्या पालकांना वेगवेगळ्या तीन दवाखान्यात जावे लागले. त्यामुळे त्यांची फरपट झाली. एका रुग्णालयातून पैशांअभावी तिला तिसरीकडे हलवावे लागले, असे पालकांनी सांगितले.


अशी झाली तेजस्विनीच्या वडिलांची फिरफिर
तेजस्विनी आर. आर. शाळेतील इयत्ता 9वीत शिकते. तिचे कुटूंबीय अजिंठा हौसिंग सोसायटीत राहतात. मंगळवारी सकाळी ती सायकलीने शाळेत जात असताना अंजिठा चौफुलीवर तिला ट्रकने (क्रमांक एचपी 02/ 3767) धडक दिली. यात सायकलीची मोडतोड तर झालीच; पण तिचा उजवा पाय, मांडी आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर तिला तत्काळ भास्कर मार्केट समोरील डॉ. प्रताप जाधव यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिच्या हात व पायाचे एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरांनी पालकांची परिस्थिती पाहता कोणतीही फी न घेता सहयोग क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सकाळी 8 वाजेच्या सुमारास तेजस्विनीला सहयोगमध्ये आणण्यात आले. तेथे पुन्हा तिचे एक्स-रे काढण्यात आले. रक्तस्त्राव अधिक झालेला असल्यामुळे पालकांकडून रक्ताची पिशवी मागवून तिला रक्त देण्यात आले. तसेच 30 हजार रुपये अनामत जमा करण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर तेजस्विनीची वडील शांताराम सोनवणे यांनी डॉक्टरांना संपूर्ण उपचाराच्या खर्चाचा अंदाज विचारला. तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यात ऑपरेशन करण्यात येतील, असे सांगण्यात आले. डॉक्टरांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पालकांनी नाईलाजास्तव जखमी तेजस्विनीला सकाळी 10.30 वाजता डॉ.ए.जी.भंगाळे यांच्याकडे दाखल केले. दरम्यान,अपघाताबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ट्रकचालकास पोलिसानी ताब्यात घेतले आहे.


राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेतून मदत
शशिकांत हिंगोणेकर : पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्याला अपघात झाल्यास त्यांना उपचारासाठी शासनाची योजना आहे. राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून मदत होऊ शकते. यासाठी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या शाळेने अपघाताची माहिती घेऊन तसा अहवाल शासनाकडे पाठवण्याची आवश्यकता असते. उपचारासाठी 50 हजार रुपयांपर्यंत मदत होते.


आर्थिक परिस्थिती हलाखीची
तेजस्विनीचे वडील गेल्या वर्षी एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. 1400 रुपये पेंशन आणि निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या थोड्या रकमेवर ते संसाराचा गाडा हाकत आहेत. अजिंठा हाऊसिंग सोसायटीत 3500 रुपये महिना भाड्याने घर घेऊन ते राहतात. त्यांना तेजस्विनी व सातवीत शिकणारा एक मुलगा आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तेजस्विनीच्या उपचारासाठी लागणारा खर्च कसा होईल, या विवंचनेत असताना त्यांनी खर्चाचा अंदाज बांधण्यासाठी सहयोग क्रिटिकलमधील डॉक्टरांना उपचारासाठी किती खर्च येईल, यांची विचारणा केली होती. त्या वेळी त्यांनी सुरुवातीला 30 हजार रुपये जमा करण्याचे सांगितले; पण पुढे किती खर्च येईल यांची कल्पना न दिल्यामुळे आपण मुलीला डॉ.भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले, असे तेजस्विनीचे वडील शांताराम सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला सांगितले.


पैशांसाठी रुग्णावर उपचार थांबवणे बेकायदा
डॉ. अनिल पाटील : पैशांअभावी उपचार थांबवल्यास कायद्याच्या विरोधात ठरते. मात्र, रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर अँडव्हान्स मागणे गैर नाही. कधीकधी रुग्णाला अपघातात किती व कोणती इजा झाली आहे, त्याचे निदान व्हायला वेळ लागणार असल्यास खर्चाचा अंदाज देता येत नाही. - सचिव, आयएमए

खर्चाबाबत आम्ही कल्पना देत नाही
डॉ.प्रताप जाधव : सहयोग क्रिटिकलमध्ये उपचारासाठी किती खर्च येईल हे आम्ही सांगू शकत नाही किंवा रुग्णांच्या नातेवाइकांनाही सांगत नाही. तेजस्विनी अपघातामुळे भेदरलेल्या अवस्थेत होती. शिवाय तिच्या मांडीवर गंभीर दुखापत झाल्यामुळे प्लॉस्टिक सर्जरी करण्याच्या उद्देशाने आपण तिला सहयोगमध्ये हलविण्याचा सल्ला दिला होता. - अस्थिरोगतज्ज्ञ

खर्चाची कल्पना देऊनच रुग्ण पाठविले जातात
डॉ.अरुण पाटील : आमच्याकडे थेट रुग्ण येत नाही. जे डॉक्टर आमच्याकडे रुग्ण पाठवतात ते खर्चाची कल्पना देऊनच पाठवतात. त्यामुळे आमचा खर्च सांगण्याचा प्रo्नच येत नाही. संबंधित रुग्णाकडून अँडव्हान्स घेण्यासंदर्भात झालेली चर्चा मला माहित नसल्यामुळे माहिती घेतो.
- संचालक, सहयोग क्रिटिकल केअर सेंटर