आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासांत तिन्ही ऋतूंची जळगावकर घेताहेत अनुभूती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दिवसा उकाडा करणारे ऊन, रात्री कडाक्याची थंडी, सकाळ, सायंकाळ असणारे ढगाळ वातावरण आणि रात्री पाऊस या स्थितीमुळे वातावरणात अचानक बदल होत आहे. सतत बदलणार्‍या वातावरणामुळे जळगावकर चोवीस तासांत तिन्ही ऋतूंचा अनुभव घेत आहेत.


रात्रीच्या तापमानात घट आणि दिवसा वाढणारा उकाडा यामुळे उन्हाळा लागल्याची चाहूल गेल्या आठवड्यात जळगावकरांना लागली. शुक्रवारी कमाल 31 आणि किमान 21 अंशांवर तापमान गेल्याने तसा अनुभव आला तर रविवारी किमान तापमान 16.1 अंशांपर्यंत खाली आले होते. सोमवारी कमाल तापमान 33 अंशांपर्यंत पोहोचले आहे. रविवारी रात्रीपासून असलेले ढग वातावरण सोमवारी सकाळीही कायम होते. हवेचा वेग आणि दिशा यामुळे पाऊस पडतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. सकाळी 11 वाजेनंतर मात्र उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली. वातावरणातील चढउतार चर्चेचा विषय ठरला होता. कमी दाबाचा पट्टय़ामुळे निर्माण झालेला हा बदल तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.


गेल्या वर्षीही होती अशीच स्थिती
लक्षद्वीप ते दक्षिण गुजरातपर्यंतच्या टप्प्यात गेल्या आठवड्यापासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा अद्याप कायम असल्याने महाराष्ट्रात विदर्भासह काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांत पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यातील बोदवड व जामनेर तालुक्यात रविवारी पाऊस झाला. वार्‍याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर आहे. उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी अजूनही बर्फ पडत असल्याने थंडीची लाट आलेली आहे. त्यातच दिवसाच्या तापमानात झालेली वाढही कायम आहे.

गेल्या वर्षीदेखील फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात मोठे बदल झाले होते. दिवसभराच्या तापमानात चढ-उतारांसह पाऊसही पडला होता. तिच स्थिती यंदाही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिसून येत आहे.