आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon News On State Transport Corporation, Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बस प्रवाशांना यापुढे कागदी पासऐवजी मिळणार स्मार्टकार्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार आता पासेसच्या पद्धतीत स्मार्टनेस आणला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची कागदी पासेसपासून लवकरच सुटका होणार असून, त्यांना आता स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. त्यासाठी विभागातील कर्मचार्‍यांना मुंबईला प्रशिक्षण देण्यात आले असून, तेथून प्रशिक्षण घेऊन आलेले कर्मचारी डेपोनिहाय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच जळगावात येत्या आठ दिवसांत स्मार्टकार्डचे वितरण सुरू होणार आहे.


‘प्रवासी वाढवा’ मोहिमेंतर्गत राज्य परिवहन महामंडळाने वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. पूर्वी प्रवाशांना कागदाच्या पासेस दिल्या जात होत्या; मात्र त्या काही काळानंतर खराब होत होत्या. ही बाब हेरून महामंडळाने पासधारकांना स्मार्टकार्ड देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मार्टकार्ड एकदा काढल्यास त्याची मुदत तीन वर्षांपर्यंत राहील. प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणापर्यंतचे रिचार्ज करावे लागणार आहे. त्यामुळे कागदी पासेस आता हद्दपार होणार आहेत. या स्मार्टकार्डमध्ये प्रवाशांची संपूर्ण माहिती राहणार आहे. बसमधील वाहकाला कार्ड देताच त्याच्याकडे असलेल्या मशीनमध्ये त्याची पाहणी करता येईल. यासंदर्भात विभागातील कर्मचार्‍यांना मुंबई येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. आगारातील कॅश विभागात ही रिचार्ज मशीन बसवण्यात आली असून, पुढील आठ दिवसांत ही सिस्टीम सुरू होणार आहे.


पाच मशीन दाखल
‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटी कॉम्बिनेशन’ असे या मशीनचे नाव असून, आगारात अशा पाच मशीन आणण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना कायम व अस्थायी या दोन स्वरूपात स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. सुरुवातीला 5 रुपये कार्ड, 2 रुपये फोटो व 30 रुपये शुल्क असे 37 रुपये भरून कोणतीही पास स्मार्टकार्डच्या स्वरूपात काढता येणार आहे.


ऑनलाइन रिचार्ज
प्रवाशांना कार्ड रिचार्ज करण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज नाही. एसटी महामंडळाच्या वेबसाइटवरूनही रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच रिचार्जची सुविधा प्रत्येक डेपोमध्ये करून देण्यात येणार आहे. पासधारकांना रांगेतही उभे राहावे लागणार नाही. चार व सात दिवसांसह त्रैमासिक आणि विद्यार्थ्यांच्या पासेस याद्वारे दिल्या जाणार आहेत.


एसटी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण
स्मार्टकार्डचा वापर कशा प्रकारे करायचा याबाबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच जिल्हय़ात ही सुविधा आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत. राजीव सावळे, विभाग नियंत्रक