आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात : राजपत्रित अधिकारी देणार दुष्काळ निधीसाठी पगार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्यात दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजनेबरोबर अर्थिक मदतीचा हात पुढे येत आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाने मार्च व एप्रिल महिन्यातील प्रत्येकी एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून सुमारे 93 लाखांची मदत उपलब्ध होणार आहे.

टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनस्तरावर आतापासूनच उपाययोजना आणि निधीची तरतूद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी राजपत्रित अधिकारी महासंघाने मार्च आणि एप्रिल महिन्यातील एक-एक दिवसाचा पगार टंचाई निवारणार्थ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लागलीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही मदतीचा हात पुढे केला. इतरही संस्थांच्या पुढाकारातून छोट्या-छोट्या स्वरूपात निधी उभा राहिल्यास टंचाईवर मात करण्यास मदत मिळणार आहे. राज्यात राजपत्रित अधिकारी महासंघाचे 1 लाख 5 हजार सभासद आहेत. त्यानुसार सुमारे 40 कोटी रुपये निधी संकलित होईल.

जिल्ह्यातून 93 लाख 50 हजार रुपयांचा निधी संकलित होणार आहे. राजपत्रित अधिकार्‍यांच्या समितीत वर्ग एक आणि दोनचे अधिकारी येतात. जळगावच्या समितीत 2350 सभासदांची नोंदणी झालेली आहे. त्यात वर्ग एक चे 800 अधिकारी आणि वर्ग दोन मध्ये 2550 अधिकारी असून यात कनिष्ठ अभियंत्यांचाही सहभाग आहे. वर्ग एकच्या अधिकार्‍यांना 1600 ते 1700 रुपये रोज तर वर्ग दोनच्या अधिकार्‍यांना 1200 ते 1300 रुपये रोज पडतो. त्यानुसार त्यांचा दोन दिवसांचा पगार 93 लाख 50 हजारांपर्यंत जातो.

शासनच करणार कपात : मार्च महिना भरल्यानंतर पगारातूनच एकदिवसाची रक्कम कपात करण्याचे अधिकार महासंघाने शासनाला दिले आहेत. त्यासाठी कर्मचार्‍यांना निधी संकलित करण्याची गरज राहणार नाही.

टंचाईमुळे शासन अडचणीत असताना त्यांना मदत करणे शासकीय कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे. त्यानुसार महासंघानेही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे सर्व अधिकार्‍यांनी स्वागत केले. जिल्ह्यातील समितीनेही त्यास पाठिंबा दिला आहे. बी.एस. वाणी, सरचिटणीस, राजपत्रित अधिकारी समन्वय समिती