आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : मोकाट कुत्र्यांनी चिमुरड्यांचे तोडले लचके, मोकाट कुत्र्यांची दहशतीत दिवसेंदिवस वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हसनैन खान जाकीर खान कुरेशी - Divya Marathi
हसनैन खान जाकीर खान कुरेशी
जळगाव : संपूर्ण शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी विविध भागांत कुत्र्यांनी १० जणांना चावा घेत जखमी केले. उस्मानिया पार्कमध्ये दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या गालाचा लचका तोडल्यामुळे त्याला उपचारासाठी थेट औरंगाबाद येथे हलवण्यात आले. 
 
हसनैन खान जाकीर खान कुरेशी हा रविवारी सायंकाळी ७ वाजता अंगणात खेळत असताना अचानक समोरून आलेल्या एका मोकाट कुत्र्याने त्याच्यासह त्याची आई शबानाबी खान दिलशान दानिश तेजी यांच्यावर हल्ला चढवला. यात हसनैनच्या गालाचा लचका तोडला. त्यामुळे त्याच्या गालाचे मांस लटकले होते. परिसरातील नागरिकांनी हसनैनची कुत्र्यापासून सुटका केली. त्यानंतर त्याला परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनी हसनैनला औरंगाबाद येथे हलवण्याचा सल्ला दिला.
 
...यांना देखील घेतला चावा 
रविवारी शहरातील इतर भागात देखील कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यातील जखमींमध्ये वृद्धांसह लहान मुलांचा समावेश आहे. सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये रुख्मिणी लक्ष्मण शिंगटे (वय ६५, रा. शिवाजीनगर), अरुणा राजेश चव्हाण (वय ३८, सम्राट कॉलनी), शबानाबी मुश्ताक अली (वय ४, गेंदालाल मिल), शरिया मोहंमद रफिक (वय ६, गेंदालाल मिल), हितेश प्रल्हाद वारुळे (वय साडेतीन वर्षे, खोटेनगर), इसाल रेवेलसिंग भिलाला (वय ६, रा. पाल), प्रदीप सुरसिंग पाटील (वय ४०, पिंप्राळा), नामदेव जाधव (वय ५१, कुसुंबा), श्यामकांत गुजर (वय ४०, निमखेडी) यांचा समावेश आहे. 
 
२०० नागरिक रस्त्यावर 
उस्मानिया पार्क परिसरातील घटनेनंतर सुमारे २०० नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. या परिसरात ५०हून अधिक मोकाट कुत्र्यांचा दिवसरात्र वावर असताे. त्यामुळे नागरिकांमध्ये सतत भीती पसरलेली असते. मनपाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...