आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्‍या तांबापुरा भागात संचारबंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-तांबापुरातील बिस्मिल्ला चौकात मंगळवारी झालेल्या दोन गटातील दगडफेकीचे पडसाद बुधवारी पुन्हा उमटले. अपूर्ण पोलिस बंदोबस्तामुळे सुमारे 45 मिनिटे दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक झाली. यात दोन पोलिस कर्मचार्‍यांसह नऊ नागरिक जखमी झाले. दरम्यान, बुधवारी रात्री 12 वाजेपासून पुढील 24 तासांसाठी संचारबंदी लागू झाली आहे.

मंगळवारी झालेल्या दगडफेकीमुळे बुधवारी नगरसेवक सुनील महाजन आणि समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांनी दोन वेगवेगळ्या बैठका घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. मात्र, बैठकी संपताच पुन्हा दंगल उसळली. सायंकाळी 4.15 वाजता बिस्मिल्ला चौक, मच्छी बाजार, भिलवाडा भागातील दोन्ही गट समोरासमोर येत एकमेकांवर दगड भिरकवण्यास सुरुवात केली. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलिसांनी दंगलीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. दोन्ही गटातील 25 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षकांनी रात्री 12 वाजेपासून संचारबंदीचे आदेश दिले. इच्छादेवी ते शिरसोली नाका दरम्यानचा रस्ता बंद केला आहे.

पोलिस बंदोबस्त पडला कमी

मंगळवारच्या दंगलीनंतर बुधवारी पोलिसांनी तांबापुरा परिसरात बंदोबस्त ठेवला नव्हता. त्यामुळे दंगल सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांनी अतिरिक्त बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत दगडफेकीत रिक्षा (क्रमांक एमएच 19 बीजे 5546), दुचाकी (क्रमांक एमएच 19 जी 6280) व इतर वस्तूचे नुकसान झाले. अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका आणि पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अवघ्या चार पोलिस कर्मचार्‍यांच्या मदतीने परिस्थिती हाताळली. रात्री 250 कर्मचारी तैनात केले होते

पोलिसांनी कोंबिंग करून संशयितांना घेतले ताब्यात
दंगलीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी घराघरात घुसून दंगलखोरांना ताब्यात घेतले. यात शरीफ शहा रशीद शहा, सय्यद इरफान, मुजाबिद शेख गणी, सय्यद आमिर सय्यद नमाज, भिकूबाई हटकर, अकिल सलाम, शेख शरीफ शेख कुरबान, जाकीर पीरन, शेख शरिफोद्दीन, असलम खान हबीब खान, हसिनाबी पटेल, आरिब शेख शकिल, बशीर शाह, फिरोज चिरागोद्दीन, कलंदर शेख खाटीक, नुर अली सय्यद सलीम, सोहेब शेख, इमरान शेख, मजीद शेख, शेख मोईनोद्दीन, समीर शाह, याकुब जावेद, शेख हारुण, सय्यद पटेल यांचा समावेश आहे.

मंगळवारच्या घटनेचा बुधवारी गुन्हा दाखल

मंगळवारी झालेल्या दंगलीत पोलिस उपनिरीक्षक डी.डी.इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रईस इकबाल पिंजारी, हमीद उस्मान उर्फ हमीद पेहलवान, समीर गुलाब खाटीक, उत्तम सोनवणे, शोएब खाटीक, बबलू शेख, दिलावर खाटीक, कपाटवाला फरीद खान, युसूफ खान, अय्युब खान यासह इतर 14-14 अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी फरीद खान, युसूफ खान आणि उत्तम सोनवणे यांना अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायाधीश ए.डी.बोस यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिघा संशयितांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

दगड, काचांचा खच

मंगळवारी केवळ एकाच गल्लीत झालेली दंगल बुधवारी संपूर्ण तांबापुरा भागात पसरली. यात झालेल्या दगडफेकीमुळे संपूर्ण तांबापुरा भागात दगड, काचांचा खच पडला होता. सायंकाळी 7 वाजता सर्व संशयितांना पोलिसांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केले.

आता फिक्स पॉइंट

तांबापुरा भागात पेट्रोलिंग करीत असल्यामुळे बिस्मिल्ला चौकात ऐन दंगलीच्यावेळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाला. तसेच सायंकाळी 6 वाजता बिस्मिल्ला चौकात टेंट टाकून बंदोबस्त वाढवला असून रात्री 250 पोलिस कर्मचारी तांबापुरा भागात पेट्रोलिंगसाठी नियुक्त केल्याचे पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांनी सांगितले.