आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी उघड; चार दिवसांत जळगाव पोलिसांनी लावला छडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आदर्शनगरातील मंगलचंद्र जाजू यांच्या घरात 30 जून रोजी घरफोडीत 25 लाखांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली होती. ही घरफोडी चौथ्या दिवशी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून चोरट्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आदर्शनगरात झालेल्या घरफोडीमुळे शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळे चोरट्यांना पकडण्यास पोलिसांपुढे आव्हान ठाकले होते. असे असाताना पोलिस प्रशासनास चोरट्यांना पकडण्यात यश आले असून दोन संशयितांकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. घटना घडल्यानंतर जिल्हापेठ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी तांबापुरा भागातील संशयितांवर नजर ठेवली. त्यामुळेच संबंधितांच्या हालचाली टिपून हे यश मिळाले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रभारी निरीक्षक प्रदीप ठाकूर उपस्थित होते.

30ला धागेदोरे हाती
घरफोडी झाल्याच्या रात्रीच पोलिसांनी आदर्शनगर समोर असलेल्या तांबापुरा भागातून 10 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 2 जुलै रोजी त्यातील भोला बावरी आणि जगत बावरी यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. भोला बावरीने एमआयडीसी परिसरात असलेल्या एका वर्कशॉपमधून तर जगतने त्याच्या राहत्या घरातून माल काढून दिला. दोन्हींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींकडून आणखी चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.