आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी चोरणार्‍यांपैकी दोघांना मुंबईतून अटक; पोलिसांना आता मास्टरमाइंड बाबू अमरसिंगचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई, ठाणे या भागातून चारचाकी वाहनांची चोरी करून जळगावात विल्हेवाट लावणार्‍यांचे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्यानंतर मुंबईत दोघांना अटक केली आहे. धुळे येथून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला राजदत्त परब नव्हे तर या सर्व रॅकेटचा मास्टरमाइंड बाबू अमरसिंग होता. पोलिसांच्या ताब्यात असलेला पोलिस पाटील किशोर यालाही मास्टरमाइंड परब असल्याचीच माहिती होती. प्रत्यक्षात राजदत्त परब हा वेगळाच व्यक्ती असल्याचे शुक्रवारी समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजदत्त परब आणि प्रमोद जगन्नाथ गावडे या दोघांना ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील रघुनाथनगरमधून ताब्यात घेतले आहे.
मास्टर माइंड बाबूच
स्थानिक गुन्हे शाखेने उघड केलेल्या गाडीचोरीच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा बाबू अमरसिंग आहे. तो मुंबई, ठाणे, नाशिक परिसरातील गाड्या चोरायचा. त्यांची विल्हेवाट प्रमोद गावडे हा धुळे येथील बब्बू गॅरेजवाल्याकडे करायचा. या बब्बूनेच किशोरची ओळख बाबू अमरसिंगची राज परब म्हणून करून दिली होती. बब्बू या गाड्या किशोरला विकत होता. किशोर या गाड्यांची बनावट कागदपत्रे नाशिक येथील सुरेश सूर्यवंशी यांच्याकडे तयार करून विकत होता. त्यानंतर तो राजदत्त परब या नावाने असलेल्या ठाणे येथील अँक्सिस बॅँकेच्या खात्यावर पैसे टाकत होता. त्यामुळे किशोरला बाबू हाच राजदत्त असल्याचे माहिती होते. त्याने पोलिसांना तशीच माहिती दिली होती. बाबू अमरसिंगही ठाण्यातील रघुनाथनगरमधीलच रहिवासी आहे. त्याच्या वडिलांवरही अनेक गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे.
बब्बूने तोडल्या 10 गाड्या
धुळे येथील बब्बू गॅरेजवाला किशोरला गाड्या विकण्याचे काम करीत होता. त्याच्याकडे आलेल्या चोरीच्या गाड्यांमधील जवळपास 10 गाड्या बब्बूने तोडून त्याचे पार्ट विक्री केल्याची माहिती किशोरने पोलिसांना दिली आहे. किशोरच्या अटकेच्या बातम्या कळाल्यानंतर बब्बूने गॅरेज उघडलेच नसल्याचे त्याच्या बाजूच्या गॅरेजवाल्यांनी पोलिसांना सांगितले.
बब्बू, किशोरमध्ये वाद
गेल्या दीड वर्षांपासून हे रॅकेट अशाच पद्धतीने काम करीत होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपूर्वी बब्बूचे आणि किशोरचे पैशांच्या व्यवहारातून वाद झाले. त्यामुळे किशोरने सरळ राजदत्तशी म्हणजे खर्‍या बाबूशी व्यवहार सुरू केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेची टीम
शुक्रवारी राजदत्त परब, प्रमोद गावडे यांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे गिरीधर निकम, बापूराव भोसले, उत्तमसिंग पाटील, रवी पाटील, संजय पाटील, सुरेश पवार ठाणे येथे गेले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा या दोघांना घेऊन हे पथक परत येणार आहे.
मोबाइलवरही सापडणे कठीण
पोलिस अनेक गुन्हेगार फोन अथवा मोबाइलवरील संभाषणातून निष्पन्न करतात. मात्र, परबने स्वत:साठी एक आणि किशोरसाठी एक मोबाइल सिमकार्ड दिले होते. त्या क्रमांकावरून दोघे एकमेकांना फोन करायचे, त्यामुळे पोलिसांनाही अनेक दिवसांपासून ते सापडत नव्हते.