आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात खाविआ फुटणार; सुरेश जैन यांचा भाजपकडे कल : ईश्वरलाल जैनांनी उघडले पत्ते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहेबांसाठी स्पेशल खुर्ची... साहेब अजिंठा विश्रामगृहात बैठकीला येणार, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी स्पेशल खुर्ची मागवली होती. शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना बसायला खुर्ची देण्यासाठी कार्यकर्त्यांची अशी धावपळ झाली. - Divya Marathi
साहेबांसाठी स्पेशल खुर्ची... साहेब अजिंठा विश्रामगृहात बैठकीला येणार, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी स्पेशल खुर्ची मागवली होती. शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना बसायला खुर्ची देण्यासाठी कार्यकर्त्यांची अशी धावपळ झाली.
जळगाव : माजी आमदार सुरेश जैन यांचे निकटवर्तीय प्रदीप रायसोनी यांनी स्वतंत्र आघाडीची नोंदणी केली आहे. महापालिका निवडणुकीत ते स्वत:चे पॅनल उभे करतील. सुरेश जैन ही भाजपकडे झुकलेले आहेत. त्यांची खान्देश विकास आघाडीतही फूट पडून काही नगरसेवक भाजपमध्ये सामिल हाेतील, अशा शब्दात माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी जळगावच्या आगामी राजकारणाचे पत्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमाेर उघडले. दरम्यान, राष्ट्रवादीने आगामी मनपा निवडणुकीत पूर्ण ताकदीसह उतरण्याची तयारी सुरू केली असून याबाबत पूर्वनियोजनाचे धडे पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. 
 
चोपडा येथे साेमवारी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महाेत्सवाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी दुपारी वाजता जळगावातील अजिंठा विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी राष्ट्रावादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे-पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, वसंतराव मोरे, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, रवींद्र पाटील, अनिल पाटील, गफ्फार मलिक, शोभा पाटील, मीनल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 
जळगाव शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याबाबत कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. याप्रसंगी पवार यांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडे बघत बाबूजी नेतृत्व करतील, असे विधान केले. मात्र, जैन यांनी स्पष्ट नकार देत मी निवडणूक लढणार नाही; पण मनीष हे तुमच्यासोबत असतील असे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष अामदार डॉ.सतीश पाटील यांनी सांगितले की, मनीष हे आमचे उमेदवार राहतील. लोकसभा विधानसभा दूर आहेत. आगामी काळात मनपा निवडणूक आहे. ग्रामीण कार्यकर्त्यांची शहरात लक्ष देण्याची मानसिकता नाही. आजी-माजी आमदारांनी शहरात लक्ष द्यावे, एकत्रितपणाने निवडणूक लढवावी, फक्त शहरातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोडू नका, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 
 
 जळगाव शहराला परिवर्तन देणारे नेतृत्व पुढे आणा : शरद पवार 
आगामी काळात जळगाव महापालिकेच्या निवडणुका असून त्याकडे लक्ष केंद्रित करा, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावण्यासाठी जळगाव शहराला परिवर्तन देणारे नेतृत्व पुढे आणा. तरच लोक विश्वास ठेवतील. ग्रामीण जिल्हा नेत्यांनीही शहराकडे लक्ष द्यावे. शहरातील वातावरण पुढे ग्रामीण भागात निर्माण होत असते. कार्यकर्ते एकत्र राहिल्यास पाचपेक्षा जास्त आमदार जिल्ह्यात निवडून येऊ शकतात. यासाठी एकत्रित बसून सक्षम महानगराध्यक्ष, महिला अध्यक्ष संघटनात्मक निर्णय घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले. 
 
तसेच पवार यांनी जळगावचे महापौर कोण आहे, सत्ता कुणाची आहे? राष्ट्रवादीचे किती नगरसेवक आहेत? यापैकी महिला किती? याबाबत विचारणा केली. तुम्ही मनपावर लक्ष केंद्रित का करीत नाही? असा प्रश्नही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केला. या वेळी पदाधिकाऱ्यांनी शहरात संघटन कमकुवत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना काॅन्फिडन्स देण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. 
 
शहराचे परिवर्तन करण्याची क्षमता असलेले नेतृत्व आतापासून प्रोजेक्ट करा. एकजूट दाखवली तरच लोक विश्वास ठेवतील. जिल्ह्यात वातावरण निर्मिती करा. चुकांची दुरुस्ती करा, असा मोलाचा सल्ला शरद पवार यांनी दिला.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमधील गृहकलह चव्हाट्यावर 
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच मॅनेज होत असतील तर कार्यकर्ते तरी काय करणार? राष्ट्रवादीचा विधानसभेचा उमेदवार मॅनेज होतो. जिल्हा बँकेतही तशीच भूमिका घेतली जाते. कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवल्यास पक्षाचे नेते मागे राहत नाहीत. आंदोलन कार्यकर्त्यांनाच करावे लागते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गृहकलह कार्यकर्त्यांनी पवारांच्या उपस्थितीत चव्हाट्यावर आणला. 
 
माजी खासदार वसंतराव मोरे यांनी शहराला सक्षम नेतृत्व नाही. नेतेच मॅनेज होत असल्याने कार्यकर्ते तरी काय करणार, असे सांगितले. शहराला सक्षम महानगराध्यक्षाची गरज आहे. केवळ लेवा पाटील मराठा समाजाचे नेतृत्व पुढे करून चालणार नाही. मारवाडी, गुजराती समाजातील नेतृत्व पुढे करावे लागेल, असे विधान केले. या विधानाला काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. मी जातीवाद करीत नसल्याचे स्पष्ट करीत सत्य परिस्थिती मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. ईश्वरलालजैन यांनी विधानसभा निवडणुकीत मनोज चौधरी मॅनेज झाल्याचे विधान केले. तर शाेभा पाटील यांनी कार्यकर्ते निवडणुकीला उभे राहिल्यास नेते पाठीशी उभे राहत नसल्याची तक्रार केली. सावद्याचे माजी नगराध्यक्ष वानखेडे यांनी जिल्हा बँकेतही पक्षाचे नेते विरोधकांना मॅनेज असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी एकत्र बसून आपसात पक्षाबाबत संघटनात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. 
 
बातम्या आणखी आहेत...