आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Politics News In Marathi, BJP, Lok Sabha Election, Divya Marathi

सत्तेचा सारीपाट: वर्चस्वासाठी राजकीय शत्रूच्या शत्रूंवर गळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सद्य:स्थितीत भुसावळात पालकमंत्री गट आणि भाजपमधील एका मोठय़ा गटाचे आपसातील संबंध मधूर आहेत. दोघांचा चौधरी बंधूंना असलेला समान विरोध हेच या मागील मूळ कारण आहे. मात्र, अनिल चौधरींची भाजपकडील वाटचाल पाहता विधान सभेच्या दृष्टीने पालकमंत्री गट सावध झाला आहे. परिणामी राजकीय शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र या म्हणीनुसार भाजपमधील मित्रांना शोधून चौधरी विरोधी सूर अधिक बळकट करण्याचे छुपे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसवर माजी आमदार संतोष चौधरींचा एकछत्री अमल होता. तरीही भाजप उमेदवाराला 10 हजारांचे मताधिक्क्य़ मिळाले. राष्ट्रवादीमधून भाजपला रसद पुरवठा झाल्याने अँड. रवींद्र पाटलांचा हातातोंडाशी आलेला विजय निसटला होता. मात्र, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राष्ट्रवादीमध्ये माजी आमदार चौधरी सर्मथक आणि पालकमंत्री संजय सावकारे सर्मथक, असे सरळ दोन गट पडले. एकमेकांची उणीदुणी काढण्यासोबत जाहीरपणे उद्धार करण्यातही या गटांनी कसूर सोडलेली नाही. लोकसभेच्या पाश्र्वभूमीवर या दोन्ही गटांची भूमिका निर्णायक आहे. मात्र, आता अनिल चौधरींनी भाजपची ओढ दाखवल्याने पालकमंत्री गटाने भाजपमधील चौधरी विरोधकांना अप्रत्यक्ष गोंजारणे सुरू केले आहे. याचे कारण आगामी विधानसभेचा मार्ग मोकळा करणे हे असू शकते. अनिल चौधरींनी भाजप प्रवेश केलाच तर विधानसभा निवडणुकीत पडणारा खड्डा भाजपमधील चौधरी विरोधी ताकदीचा वापर करून भरण्याचे गणित या मागे असण्याची दाट शक्यता आहे.
आयती संधी मिळाली
अनिल चौधरींचा भाजप प्रवेश झाल्यास राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या गणितावरही परिणाम होईल. मात्र, ही संभाव्य हानी भरून काढण्याची आयती संधी पालकमंत्री गटाला मिळाली आहे. चौधरींच्या प्रवेशावरून भुसावळ भाजपमध्ये उठलेल्या नाराजीचा फायदा करून घेण्याची ही संधी आहे. भाजपमधील मित्रांद्वारे चौधरींना करता येईल तेवढा विरोध करायचा. तरीही प्रवेश झाला तर निर्माण झालेल्या नाराजीचा विधानसभेत लाभ उठवायचा, अशी दुहेरी चाल पालकमंत्री गटातील राजकीय धुरिणांनी आखल्याचे दिसते. कारण या मुळे चौधरींना खिंडीत गाठण्यासह विरोधी पक्षाला खिळखिळे करता येणे शक्य आहे.
विरोधाचा फायदाच
चौधरी बंधू कायद्याच्या कचाट्यात असताना सावकारेंना समोर करून राष्ट्रवादीने पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत युतीला चारीमुंड्या चित केले. आता चौधरी बंधू आणि सावकारेंमध्ये फाटल्याने सेना-भाजपमधील काही मंडळी पालकमंत्री सावकारेंसोबत संधान साधून आहेत. मात्र, काहीही झाले तरी भविष्यातील खरी लढत राष्ट्रवादीचे सावकारे आणि सेना-भाजपमध्ये होईल. त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून संतोष चौधरी की राजकीय स्पर्धक म्हणून सावकारेंना विरोध करायचा, हा निर्णय सावकारेंसोबत जवळीक साधून असलेल्या भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांना घ्यावा लागेल. कारण चौधरींना विरोध केला तरी फायदा सावकारेंच्या रूपाने अप्रत्यक्ष राष्ट्रवादीलाच होईल.