आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिधूरवाड्यात दुसर्‍या दिवशीही शांतता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिधूरवाड्यात दुसर्‍या दिवशीही हत्या केलेल्या प्रशांत सोनवणेच्या आईचा आक्रोश कायम होता. स्मशान शांतता असलेल्या रिधूरवाड्यात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांव्यतिरिक्त दिवसभर कोणीही दिसत नव्हते.
प्रशांतचा खून झाल्यानंतर सोमवारी रिधूरवाड्यात अक्षरश: गर्दी ओसांडून वाहत होती. मंगळवारी दिवसभर प्रत्येकाच्या नजरा रिधूरवाड्यावर लागलेल्या होत्या. रिधूरवाड्यात ज्या ठिकाणी प्रशांत राहतो त्याच्याच घरासमोर खून करणारा नरेंद्र सपकाळेदेखील राहतो.
एवढेच नाही तर तेथेच संशयित आरोपी नगरसेवक कैलास सोनवणे देखील राहतो. अत्यंत निर्घृणपणे हा खून झाल्यामुळे संतप्त नातेवाइकांचा मंगळवारी आक्रोश कायम होता. प्रशांतच्या घरी येणारा जाणारा प्रत्येक जण कैलास सोनवणेच्या घराकडे पाहून शिवीगाळ करीत होता. मंगळवारीही सकाळपासून नेहमी गजबजलेल्या रिधूरवाड्यात स्मशान शांतता होती.
कैलास सोनवणेच्या घराकडे कोणीही फिरकत नव्हते. नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या घराचा दरवाजा आज दिवसभर बंदच होता. प्रशांतच्या घरून त्याच्या आईचा ऐकू येणारा आक्रोश मात्र मन हेलावणारा होता. प्रशांतची आई, बहीण, भाऊ यांचा रडण्याचा आवाज रिधूरवाड्याच्या कोपर्‍यापर्यंत येत होता. प्रत्येकवेळी माझ्या मुलाला न्याय द्या, त्याच्या मारेकर्‍यांना सोडू नका, त्यांना शिक्षा करा, अशा विनवण्या प्रशांतच्या घरी येणार्‍या प्रत्य्ेाकाला त्याची आई करीत होती. पाषाणालाही पाझर फुटावा, अशीच परिस्थिती मंगळवारी दिवसभर रिधूरवाड्यात होती.