आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंगळ कारभार - खुनातील संशयित पालिकेच्या सेवेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेचे कर्मचारी काम करीत नाहीत, दांडीबहाद्दर व लेट लतीफ आहेत, असे म्हटले जायचे. काही दिवसांपूर्वी तर कर्मचारी पगार महापालिकेकडून घेतात मात्र काम ठेकेदारांचे करतात, असा आरोप करण्यात आला होता. त्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, त्यात सत्यता असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या हाती आलेल्या पुराव्यावरून स्पष्ट होत असून रिधूर वाड्यातील प्रशांत सोनवणेच्या खुनातील आरोपी व संशयित हे चक्क महापालिकेच्या ‘सेवेत’ आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत पुरावा मागणारे महापालिका प्रशासन याप्रकाराची चौकशी करून त्यांना ‘शासन’ करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून रिधूर वाड्यातील प्रशांत सोनवणे (वय 22) या तरुणाचा आधी खून व नंतर जाळण्याचा प्रकार घडला. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर रिधूर वाडा या भागात संतापाची लाट उसळली होती. जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर दोन दिवस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर सामान्य जळगावकर प्रचंड धास्तावला आहे. मात्र, घटनेला अंतिम रूप देणारे आरोपींचे ‘पोषण’आपलीच महापालिका करीत असल्याचे उजेडात आले आहे.
हे आहेत मनपा सेवेत - घटनेनंतर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला आरोपी नरेंद्र डिगंबर सपकाळे हा नगरसेवक कैलास सोनवणे यांचा जवळचा नातलग असून तो सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई पदावर कामावर आहे. तसेच संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेला विलास नारायण सोनवणे हा नगरसेवक कैलास सोनवणे यांचा लहान भाऊ आहे. तो देखील पाणीपुरवठा विभागात मजूर म्हणून कामावर आहे. तर संशयित असलेला संजय साळुंखे हा देखील मजूर म्हणून कार्यरत आहे. नरेंद्र व विलास हे 2001 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर सेवेत दाखल झाले आहेत.
पगार पालिकेचा काम मात्र वाळू माफियाचे - प्रशांतच्या खून खटल्यात अटकेत असलेला नरेंद्र सपकाळे हा वाळूचा व्यवसाय करतो. तर विलास सोनवणे हा भाऊ कैलास सोनवणे यांच्या कामात मदत करतो अर्थात तो देखील वाळूचा ठेकेदार असून दिवसरात्र त्याच कामात गुंतलेला असतो. संजय साळुंखे हा पूर्वी डेली बाजार वसुलीच्या कामात होता आता तो विलास सोनवणे यालाच मदत करत असतो. हे तिघेही मनपाचे कर्मचारी असले तरी त्यांनी मनपाची सेवा केव्हा के ली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ सह्या करणे व पगार घेणे एवढेच काम करीत असल्याचे मनपा कर्मचार्‍यांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.
प्रकार माहीत असूनही गप्प - वर्षानुवर्षे महापालिकेत सत्ता, त्यात काहीना काही पदे पदरात पडत असल्याने कै लास सोनवणेची ताकद वाढत होती. प्रशासनातही दबदबा असल्याने हे सगळे प्रकार माहिती असूनही सगळे गप्प आहेत. यामागे नाहक डोकेदुखी नको, अशीच भूमिका दिसून आली.
लक्ष्मीच्या आईला अटक - प्रशांत खूनप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी बुधवारी लक्ष्मीची आई तथा आरोपी नरेंद्र सपकाळेची सासू अनुसयाबाई हिस बुधवारी दुपारी अटक केली. या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे हे करीत आहेत. तपासात त्यांच्यासमोर काही बाबी पुढे आल्या असून त्या त्यांनी पडताळून पाहिल्यानंतर मुख्य आरोपी नरेंद्रची पत्नीशी लक्ष्मी हिची आई अनुसयाबाई जनार्दन कोळी हिचा देखील खुनाच्या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यानंतर तिला अटक केली. अनुसयाबाई हिचे भादली येथे घर आहे. नरेंद्रने खून केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह एका गोणपाटात भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेत असताना त्याची मोटारसायकल खराब झाल्यानंतर त्याने तो मृतदेह एका नाल्यात अंधारात टाकून दिला. त्यानंतर तो व लक्ष्मी हे दोघेही अनुसयाबाईच्या घरी गेले. त्यांनी रात्री घरात झोपलेल्या अनुसयाबाई हिला झोपेतून उठविले. तेथूनच त्यांनी टायर घेतले व त्याचा भादली येथील मित्र प्रदीप यास ओमनी कार आणण्यास सांगितले. प्रदीपने आणलेल्या कारमधून लक्ष्मी, नरेंद्र, अनुसयाबाई व प्रदीप यांनी तो मृतदेह कडगाव शिवारात नेऊन एका नाल्याच्या काठी टायरमध्ये घालून जाळून टाकला व फेकून दिला.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष - महापालिकेच्या कारभाराचे वारंवार वाभाडे निघत असतात. महापालिका नागरिकांची की कर्मचार्‍यांची, असे वातावरण आहे. कोणतेच काम सरळ मार्गाने होत नाही, लाल फितीचा फटका ही देखील कायमचीच बाब झाली आहे. एवढे असतानाही पुरावा मागणारे मनपा प्रशासन खुनाच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करेल का? असा प्रo्न उपस्थित होत असून आपल्या कामगिरीने जळगावरांना आधारवड वाटणारे प्रभारी आयुक्त सोमनाथ गुंजाळ काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.
पोलिस दलात काम करताना मेरीटला महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकार्‍याने कामकाजाची पद्धत सुधारावी. कोणतेही चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी बुधवारी आयोजित गुन्हे बैठकीत दिला. अधिकार्‍याच्या चुकीच्या कामामुळे मान खाली घालावी लागली. वर्दी डागाळली तर मी कोणालाही सोडणार नाही, असेही त्यांनी सुनावले. पोलिस दल म्हणजे टीमवर्क आहे. त्यामुळे काम करताना इतर सहकार्‍यांची मदत घ्या, असा सल्ला देऊन त्यांनी जिल्हा पोलिसदलात बोकाळलेल्या हेव्या-दाव्यांच्या राजकारणावर प्रहार केला.
नेमके काय म्हणाले पोलिस अधीक्षक एस. जयकुमार
अधिकाधिक लोकांपर्यंत जा, प्रत्येकाने संपर्क वाढवा. माझ्याशी संपर्कात रहा. वैयक्तिक समस्या असेल तरी रात्रीही कॉल करा, मी अडचणी सोडविण्यासाठी बांधील आहे. नशिराबाद खून खटल्यात आपण चुकीचे काम केले नसेल, आरोप का होत आहेत याचे आत्मपरीक्षण करा. कोणीही आपल्या कामाबाबत प्रश्न निर्माण होईल, असे वागू नका. आरोपात सत्यता आढळल्यास माफी नाही.