आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Revenue Department E Tapal Seva Starting Now

हायटेक वाटचाल: शासकीय टपालाचा टेबल प्रवास वाचणार; महसूल यंत्रणेत ‘ई-टपाल सेवा’ सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ई-ऑफिस संकल्पनेकडे वाटचाल सुरू असलेल्या महसूल यंत्रणेत ई-टपाल या महत्त्वाच्या यंत्रणेचा समावेश झाला आहे. यामुळे आता सर्वाधिक तक्रारी असलेला टपाल विभाग ऑनलाइन झाल्याने टपाल गहाळ होण्याचे प्रकार आणि टेबलांचा प्रवास वाचणार आहे. ज्या विभागाशी संबंधित टपाल असेल त्या अधिकार्‍याला टपाली ऑनलाइन नोंदणी आणि वेळ कळणार आहे, त्याच दिवशी या टपालाचा निपटारा करून ‘झिरो पेंडसी’ ठेवणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे.

महसूल यंत्रणेत टपाल विभागात येणारे टपाल संबंधित टेबलवर जाण्यासाठी अधिक वेळ लागतो. बहुतांश वेळा त्यातील महत्त्वाचे टपाल कोणते हे उशिराने कळते. टेबलांचा प्रवास टळून वेळेत टपाल संबंधित अधिकार्‍यांकडे पोहचणार आहे. गेल्या आठवड्यापासून चाचणी पातळीवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने तहसील कार्यालयातही ती सुरू होणार आहे.

अशी असेल सेवा
टपाल विभागात आलेल्या टपालाची ऑनलाइन नोंद होईल. ही नोंद करताना टपालाचा प्रकार, कोणत्या विभागाशी संबंधित आहे. त्याची वर्गवारी केली जाईल. त्या विभागाचा प्रमुख, अधिकारी यांच्या नावाने असलेल्या खात्यावर टपालाची नोंद दिसेल. ही नोंद वाचल्यानंतर पुढे काय करायचे ते टपाल कोणाकडे पाठवायचे याची नोंद संबंधित अधिकारी करेल. या सार्‍या प्रक्रियेत आज आलेले टपाल कोणाकडे आहे, त्याची स्थिती काय आहे, त्यावर कार्यवाही झाली किंवा नाही. या सार्‍याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या लॉगिंगवर असेल.

काय होईल फायदा
पत्र व्यवहारावर त्वरित कार्यवाही होईल, पत्र मिळाले नाही, टेबलवर आले नाही ही सबब अधिकार्‍यांना सांगता येणार नाही. नागरिकांना त्यांच्या टपालाची स्थिती तत्काळ कळेल.

टपालांची विविध विभागात पुन्हा नोंद करायची गरज राहणार नाही, आलेल्या पत्रांपैकी कोणते महत्त्वाचे हे लगेच कळेल, पुढे काय कार्यवाही झाली यावर लक्ष राहील. कुणी तक्रार घेऊन आल्यास टपाल कोणाकडे अडकले याचा शोध घेण्याची गरज राहणार नाही. ई-टपाल सेवेत आणखी काही बदल करण्याचे काम सुरू आहे.
धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी