आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव रोडने घेतला मोकळा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्याहद्दीतील रस्त्यांच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवण्याच्या तीनदिवसीय मोहिमेला पालिकेने गुरुवारी सुरुवात केली. भल्यापहाटेच मोहिमेला सुरुवात झाल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावल नाका ते लोणारी समाज मंगल कार्यालयापर्यंत राबवण्यात आलेल्या मोहिमेत ९८ जणांचे अतिक्रमण काढण्यात आले, तर २७ फलक ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे जळगाव रोडने मोकळा श्वास घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले हाेते. मात्र, अतिक्रमणमुक्तीच्या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढली. या मोहिमेत दुकानांसमाेर असलेले पक्के अतिक्रमित बांधकाम तोडण्यात आले. यापूर्वी अनेकदा पालिकेने अतिक्रमण काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही केली जात नव्हती. अखेर गुरुवारी पहाटेपासून मोहिमेला सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे वाजता पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कर्मचारी एकत्र आले. तेथून साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांनी मोहिमेला सुरुवात केली. सेंट अलॉयसेस हायस्कूलजवळील जीअारपी पाेलिसलाइनजवळील अतिक्रमित टपऱ्या सर्वप्रथम हटवण्यात आल्या. तसेच यावल नाक्यापर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूने असलेली अतिक्रमणे काढण्यात आली. व्यावसायिकांनी गटारींवर अतिक्रमित जागेत टाकलेले ढापे पायऱ्या तोडण्यात आल्या. आगामी दोन दिवस अर्थात शनिवारपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

इतर भागात परिणाम :गुरुवारी पालिकेने जळगाव रोडवर अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली. त्याचा परिणाम अन्य भागातही जाणवला. इतर भागातही हातगाडी व्यावसायिक, फळे-भाजीपाला विक्रेते गुरुवारी दिसले नाहीत. त्यामुळे गुरुवारी शहरातील बहुतांश रस्ते मोकळे झाले होते.

तीन लाखांचे चलन : यामोहिमेसाठी पालिकेने पोलिस संरक्षण मागितले होते. बंदोबस्तासाठी पालिकेने तीन लाख १२ हजार ९३५ रुपयांचे चलन बँकेत भरले. त्यानंतर बंदोबस्त पुरवण्यात आला.

साहित्य केले जप्त :अतिक्रमण हटवण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाने मोहिमेत अतिक्रमित जागेवरील साहित्य जप्त केले. पंचनामा करून जप्त केलेले साहित्य पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात जमा करण्यात आले. मोहिमेपूर्वी काही व्यावसायिकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढले.

मुख्याधिकाऱ्यांना संरक्षण :मुख्याधिकारी बाविस्कर यांना अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत दोन पोलिसांचे संरक्षण पुरवण्यात आले. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट देण्यात आले.

अधिकाऱ्यांची उपस्थिती
कायदा-सुव्यवस्थेचाप्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी हरीश भामरे, जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानाेरकर, डीवायएसपी राेहिदास पवार, मुक्ताईनगरचे डीवायएसपी अशाेक थाेरात, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब केदारे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब गायधनी, जळगाव येथील पोलिस निरीक्षक वसंत माेरे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक एम.एन.मुळूक यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित हाेते.
जळगाव रोडवर गुरुवारी जेसीबीद्वारे अतिक्रमणे काढण्यात आली. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. अतिक्रमण काढल्यानंतरचे साहित्य पंचनामा करून कर्मचाऱ्यांनी जप्त केले.

घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर
अतिक्रमित जागेवरील फलकही या मोहिमेत जप्त केले. काँक्रिटीकरण केलेले फलक गॅस वेल्डिंगने कापून जप्त करण्यात आले. मात्र, या कामासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करता घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात आला. तसेच सिलिंडर दिसू नये म्हणून त्यावर कापडही गुंडाळण्यात आले होते. मोहिमेसाठी चाेपडा शहर ग्रामीण, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. आरसीपीच्या दोन प्लाटूनही तैनात केल्या होत्या.

आज जामनेर रोडवर राबवणार मोहीम
यावल नाक्यापासून सुरू झालेली अतिक्रमण काढण्याची मोहीम सकाळी १० वाजता गांधी पुतळ्यापर्यंत आली. त्यानंतर पाहणाऱ्यांची गर्दी उसळली. गांधी पुतळ्यानंतर मोहीम काहीशी मंदावली होती. त्यामुळे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी या मोहिमेत एक जेसीबी मशीन वाढवले. शुक्रवारी जामनेर राेडवरील दुतर्फा अतिक्रमण चार जेसीबी मशीनद्वारे काढले जाणार आहे.

...तर गुन्हा दाखल करू
न्यायालयाच्या अादेशा नुसार शहरातील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू अाहे. त्यामुळे अतिक्रमण काढताना कुणीही अडथळा आणल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाईल. या कारवाईत कुणीही हस्तक्षेप करू नये. राेहिदास पवार, डीवायएसपी,भुसावळ
पोलिस संरक्षणासाठी बँकेत भरले तीन लाख रुपये