आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : खड्डे मोडताहेत पाठीचा कणा, संततधारमुळे खड्ड्यांची वाढतेय खोली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रस्त्यांवरील खड्डय़ांनी जळगावकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. शहरातील एकही रस्ता चांगला नसल्याने खड्डय़ांतून जाण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अस्थिरोगतज्ज्ञांच्या मते, दणक्यांमुळे ग्रासलेल्या रुग्णांचे प्रमाण 10 टक्के व शस्त्रक्रिया कराव्या लागण्याचे प्रमाण 4 टक्के आहे.

पावसाळ्यात तयार होणार्‍या खड्डय़ांची दुरुस्ती वर्षानुवर्षे होत नसल्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. खड्डय़ांमधून वाहन न्यावे लागत असल्याने बसणार्‍या दणक्यांनी मणक्यांच्या दुखापतीसह कंबरेच्या वरील माकडहाडाजवळील गादी सरकणे, कंबर वा मान लचकणे आदी प्रकारची दुखणी वाढीस लागली आहेत. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासह युवावर्गालाही होतो आहे.

रस्त्यावरील अपघात केवळ वाहनधारकांच्या चुकीमुळे अथवा समोरासमोर धडक होऊन होण्याचे प्रमाण अधिक असले तरी, पावसाळ्यात पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये पडून अथवा घसरून होणार्‍या अपघातांचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे; मात्र ते समोर येत नाही. खड्डय़ांच्या दणक्यांनी पाठीच्या मणक्यांसह कंबर वा मानेला बसलेला झटका किमान आठ ते दहा आठवड्यांपर्यंत वेदनादायी ठरतो. अशक्त बांधा असलेल्या व्यक्तींना या समस्या तर अधिक त्रासदायक ठरतात. खड्ड्यांमुळे अनेक व्यक्तींना दुखापत होऊन वर्षानुवर्षे जायबंदी व्हावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

हे होतात आजार

रस्त्यावरील अती खड्डय़ांमुळे मणक्यांचा त्रास वाढतो.
कंबरेची गादी सरकून कंबरदुखी वाढते.
माकडहाड खाली-वर सरकल्यास पाठदुखीचा त्रास वाढते.
दणक्यांमुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.
दणक्यांमुळे वृद्ध व्यक्तींचा पाठदुखीचा त्रास वाढतो.

एका खड्ड्यात दोन वेळा बसतात दणके
पाच इंचाच्या खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना बस अथवा अवजड वाहनांची पुढील चाके व मागील भाग टायरपासून तीन ते चार इंच उंचावतो. त्यानंतर मागील चाक पुन्हा त्याच खड्ड्यात जाऊन पुन्हा दणका बसतो. त्यामुळे एका खड्ड्याचा वाहनधारक व प्रवाशांना दोन दणके सहन करावे लागतात. पावसाळ्यात खड्डे बुजवण्याची कामे होत नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून दिले जाते. आता तर याला आचारसंहितेच्या कारणाचीही जोड मिळाली आहे.

असा बसतो दणका
धावणारे वाहन अचानक खड्डय़ातून गेले तर कंबरेपासून ते मानेपर्यंतच्या भागाला जोरदार झटका बसतो. त्यामुळे कंबरेच्या वरील माकडहाड व पाठीचा मणका दाबला जाऊन मानेपर्यंत त्याच्या वेदना जाणवतात. कधी कधी थेट मेंदूपर्यंत कळ जाते. हाडे ठिसूळ असलेल्या व्यक्तीला हा धक्का अतिशय वेदनादायी ठरतो, तर मजबूत शरीरयष्टी असलेल्यांना या दणक्याचा परिणाम काही काळाने जाणवतो.

हाड फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
खड्ड्यांमुळे हाडे फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या त्रासाने व्यक्ती दोन महिन्यात जायबंदी होते. पावसाळ्यात पाठ व कंबरदुखीचे रुग्ण जास्त येतात. यासह खड्ड्यांमुळे अपघात झालेल्यांवर अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागते. डॉ.मिलिंद कोल्हे, आर्थोपेडिक

तत्काळ उपचार गरजेचे
ठिसूळ हाडे असणार्‍यांना या दणक्यांचा त्रास अधिक जाणवतो. बेसावधपणे वाहनात बसलेल्यांना खड्ड्यांचा दणका अनपेक्षित असल्याने त्याचा अधिक त्रास होतो; मात्र त्रास सुरू होताच त्वरित प्राथमिक उपचार करणेही गरजेचे असते. थोडेसे दुर्लक्ष देखील भविष्यात डोकेदुखी ठरू शकते. डॉ.सुनील नाहाटा, अस्थिरोगतज्ज्ञ