आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: भंगार बाजारात तणाव, अजिंठा चौफुलीवर वाहतूक ठप्प

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजारातील दुकानदारांकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी दरमहा हप्ता मागत असल्यामुळे सततच्या त्रासाने कंटाळलेल्या व्यावसायिकांनी मंगळवारी आपल्या दुकानांना टाळे ठोकत काम बंद आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण होऊन वाहतूकही ठप्प झाली होती.

अजिंठा चौफुलीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. या भागात भंगारातील जुने वाहने तोडण्याचे काम मोठय़ा प्रमाणात चालते. या दुकानदारांकडे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी नेहमी हप्त्याची मागणी करतात. अनेक वेळा या पोलिसांना दुकानदार हप्ते देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांचा त्रास वाढला असून जास्त पैशांचे मागणी करण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुरेश पाटील, अनिल घुले, सुरज पाटील, सावळे यांनी येऊन या भागातील दुकानदारांना धमकावत त्यांच्याकडून वाढीव हप्त्याची मागणी केली. त्यामुळे त्रस्त व्यावसायिकांनी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते इब्राहीम मुसा पटेल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. न्याय न मिळेपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका दुकानदारांनी घेतली होती. नागरिकांच्या गर्दीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात जावेद खान, असलम खान, अफजल खान, सईद खान यांच्यासह पुना डिस्पोजल, समीर डिस्पोजल, एवन डिस्पोजल, इंडिया डिस्पोजल, विश्वास डिस्पोजलचे मालक व कर्मचारी सहभागी झाले होते.

या परिसरात भंगार व्यवसाय करणार्‍या काही व्यावसायिकांकडे वाहने तोडली जातात. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी नेहमीच या व्यावसायिकांना चोरीच्या वाहनांना तोडण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करतात. त्यामुळे संतप्त व्यावसायिकांनी काम बंद आंदोलन केले. या बाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार करणार आहे.
- इब्राहीम पटेल, माजी विरोधी पक्षनेते, मनपा

हा प्रकार गैरसमजुतीतून झालेला आहे. अनेक वेळा भंगार बाजारात चोरीची वाहने विकली जातात. त्यामुळे तपासणी करण्यासाठी आमच्या पोलिस ठाण्याचे कर्मचारी गेले असताना तेथील दुकानदारांनी पैसे मागितल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. तरीदेखील कोणीही कर्मचार्‍याने पैसे मागितले असतील तर त्यांची गय केली जाणार नाही.
-प्रदीप ठाकूर , सहायक पोलिस निरीक्षक