आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभाग प्रमुखपदांसाठी शिवसेनेत चढाओढ सुरू, यादी दोन दिवसांत जाहीर करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवसेनेतर्फे रविवारी विभागप्रमुख उपविभागप्रमुख नियुक्तीसाठी मेळावा घेण्यात आला. त्यात इच्छूकांची संख्या जास्त आणि पदे कमी असल्याने घोषणा दोन दिवस लांबवण्यात आली. त्यामुळे नियुक्तीबाबत चढाओढ सुरू असून पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपूर्वी निर्माण झालेली मरगळ झटकली गेल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांपूर्वी ४० हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव पत्करलेल्या शिवसेनेत सन्नाटा निर्माण झाला होता. जिल्ह्यात तीन आमदार असतानाही गेल्या काही दिवसांत जळगावात एकही मोठी बैठक होऊ शकली नव्हती. त्यामुळे कार्यकर्तेही हताश झाले होते. मात्र, उपमहानगरप्रमुख विभागप्रमुख नियुक्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. याच निमित्ताने रविवारी सकाळी ११ वाजता उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, युवा सेना जिल्हाधिकारी प्रितेश ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
समन्वय समितीची स्थापना
पक्षात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, समस्या उद्भवल्यास तसेच पक्षाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शिवसेनेची शहर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात उपजिल्हाप्रमुख चिंतामण जैतकर, शहरप्रमुख कुलभूषण पाटील, गणेश सोनवणे, युवा सेनेचे जिल्हाधिकारी प्रितेश ठाकूर, शोभा चौधरी, हितेश शहा, राजेंद्र पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
पदांचा तिढा वाढला
उपमहानगर प्रमुखांची १६ तर विभागप्रमुखांची ३२ पदे आहेत. मात्र, दोन्ही पदांच्या ते जागांसाठी इच्छुकांची संख्या चार ते पाच आहे. त्यामुळे नेमकी निवड कोणाची करायची? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा प्रथमच जागा कमी आणि काम करण्यासाठी तयारी दाखवणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे नियुक्तीचा संपूर्ण अधिकार संपर्कप्रमुखांवर सोपवण्यात आला आहे. ज्याचे नाव निश्चित करतील ते सर्वांना मान्य असेल, असे सांगण्यात आले. अनेकांनी शक्ती प्रदर्शनही केले.
मतभेद दूर ठेवा
संपर्क प्रमुख मिर्लेकर यांनी जळगावात शिवसैनिकांत मतभेद नाहीत. पण असतील तर ते दूर ठेवून संघटनेसाठी काम करा. भविष्यात प्रत्येक वॉर्डात वॉर्डातील प्रत्येकांपर्यंत पोहोचण्याची तयारी ठेवा. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. आमदार प्रा.सोनवणेंनी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकदिलाने काम करावे. ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या दृष्टिकोनातून काम करण्याचे सांगितले.