आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एफवाय’ला प्रवेश सहज, विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे ओढा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अकरावी, बारावीच्या निकालानंतर लागलीच महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. सीनिअर कॉलेजसाठी बेंडाळे महाविद्यालयात प्रवेश सुरू झाले असून मूजे तसेच नूतन मराठा महाविद्यालयात सीनियर कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास दोन ते तीन दिवस लागणार आहेत. मात्र, बारावीच्या प्रवेश प्रक्रियेने महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गजबज वाढू लागली आहे. विविध शाखांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून ओस पडलेले कॉलेज कट्टे पुन्हा बहरण्याची चाहूल महाविद्यालयांना लागली आहे.
मूजे महाविद्यालयात सोमवारपर्यंत बारावीच्या वर्गात सुमारे 600 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यात विज्ञान शाखेत सर्वाधिक प्रवेश झाले. त्यापाठोपाठ वाणिज्य आणि कला शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
मूजेत ऑनलाइन प्रवेश
मूजे महाविद्यालयात प्रथमच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांना या वेबसाइटवर प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर मॅन्युअली अर्जदेखील स्वीकारले जातील. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे थम्ब इम्प्रेशन घेतले
जाणार आहे.
सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा
अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग तसेच मेडीकल क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेल्या कॉमन एंट्रन्स एक्झाम (सीईटी) परीक्षा दिली आहे. सीईटी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. प्रवेश प्रक्रियेवर याचा परिणाम जाणवतो आहे. विद्यार्थी सीईटी परीक्षेच्या निकालानंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेत असतात. 12 जूनच्या आसपास सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.

अशा आहेत जागा
मूजे महाविद्यालयात प्रथम वर्ष कला विभागासाठी 360, वाणिज्य विभागासाठी 480 आणि विज्ञान विभागासाठी 480 जागा उपलब्ध आहेत.
नूतन मराठा महाविद्यालयात प्रथम वर्ष कला विभागासाठी 920, वाणिज्य विभागासाठी 420 आणि विज्ञान विभागासाठी 420 जागा उपलब्ध आहेत.
बाहेती महाविद्यालयात प्रथम वर्ष कला विभागासाठी 220 आणि वाणिज्य विभागासाठी 220 जागा उपलब्ध आहेत.

शाखा निहाय वाढविल्या जाणार जागांची संख्या

मूजे महाविद्यालयात ठरल्याप्रमाणे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आल्यास प्रवेश नाकारण्यात येतो. आतापर्यंत विद्यार्थी संख्या वाढवलेली नाही. सर्व शाखांमध्ये पूर्ण जागा भरल्या जातात.
अनिल राव, प्राचार्य, मूजे महाविद्यालय

सध्या सायन्स आणि कॉमर्सकडे कल वाढला आहे. आमच्या महाविद्यालयात मागच्या वर्षी कॉमर्ससाठी 125 जागा वाढविल्या होत्या. यंदाही तशीच अपेक्षा आहे.
डॉ. एल.पी.देशमुख,
प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय

मागील वर्षी दोन्ही शाखांसाठी 20 टक्के जागा वाढविण्यात आल्या होत्या. यंदाही विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास प्रवेशाच्या मर्यादेत वाढ करण्यात येणार आहे.
डॉ. ए.जी.लोहार,
प्राचार्य, बाहेती महाविद्यालय