जळगाव - अशोक टॉकीज परिसरातील रहिवासी शाहरुख पटेल यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी चंद्रपूर जिल्ह्यात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी चंद्रपूर येथे रवाना झाले.
शाहरुखच्या खुनाचा छडा लावण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी काही युवक, युवतींना ताब्यात घेतले होते. यातील बहुतेक युवक शाहरुखचे मित्र होते. दरम्यान त्याचा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे मंगळवारीच उघड झाले होते. त्याच मुद्यांवरून तपास पुढे सरकल्यानंतर पोलिसांनी काही युवकांवर पूर्णपणे संशय बळावल्यामुळे पोलिसांनी त्या युवकांचाही शोध घेतला. मात्र, जळगावातील रहिवासी असलेले हे युवक सोमवारपासूनच शहरातून बेपत्ता असल्यामुळे त्यांनीच शाहरुखचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार बुधवारी पोलिसांचे पथक चंद्रपूर रवाना झाले आहे.
एका सिमचा तिघीनी केला वापर
शाहरुखने मृत्यूपूर्वी (रविवारी) वारंवार कॉल केलेल्या एका मुलीला बुधवारी तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या मुलीकडून चौकशी दरम्यान महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ती वापरत असलेले सिमकार्ड तिच्या दोघी मैत्रिणी देखील वापरत असल्याचीबाब समोर येत आहे. त्यामुळे इतर दोघा मुलींचीही चौकशी केली जाणार आहे.