आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घड्याळाचे वाजले तीनतेरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावात 40-45 वर्षांपूर्वी शास्त्री टॉवरच्या घड्याळाचे मोठे कौतुक होते. शहरात येणार्‍या प्रत्येक माणसाला अचूक वेळ सांगणारे शास्त्री टॉवरमधील या घड्याळाची टिक टिक तीन महिन्यापासून 3 वाजून 35 मिनिटांनी थांबली आहे. प्रत्येक घटका अचूकपणे सांगणारे हे घड्याळच आता अंतिम घटका मोजत आहे. जळगावच्या लौकिकात भर घालणार्‍या या घड्याळाची टिक टिक थांबली असली तरी महापालिकेच्या उदासीनतेमुळे तीन महिन्यांपासून घड्याळाच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. स्थानिक कारागीरही घड्याळाच्या दुरुस्तीची रिस्क घ्यायला तयार नाहीत, तर नाशिकच्या कारागिराने पेमेंटची हमी मागितली आहे.

नाशिकच्या कारागिरावर भिस्त - घड्याळाच्या दुरुस्तीसाठी नाशिकच्या कारागिराने तयारी दाखवली होती. लाईट विभागाचे प्रमुख अरुण पाटील यांच्याशी त्याची चर्चाही झाली होती. मात्र, पेमेंटची हमी देत असाल तरच काम सुरू करेन, अशी त्याने अट घातली होती. मात्र, जबाबदार अधिकार्‍यांशी त्याचे बोलणेच न झाल्याने दुरुस्तीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. स्थानिक कारागिराशीही संवाद साधला होता. मात्र, त्याने कोटेशन दिले नसल्याने दुरुस्ती होऊ शकली नाही. यात एक ते दीड महिना गेला. आता घड्याळाच्या दुरुस्तीची संपूर्ण भिस्त नाशिकच्या कारागिरावर आहे. त्याने घड्याळाचे पार्टही बनविले आहेत. त्याच्याशी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी चर्चा केली तरच मार्ग निघू शकेल; अन्यथा टेंडर काढावे लागणार आहेत, ज्यासाठी आणखी किती कालावधी लागेल याची महापालिकाच शाश्वती देऊ शकत नाही.
दोन लाखांवर खर्च - सद्य:स्थितीत घड्याळाचे अनेक स्पेअर पार्ट निकामी झाले आहेत. 40 वर्षे जुने आणि दुर्मिळ झालेले या घड्याळाचे स्पेअर पार्ट मिळणेच दुरापास्त झाले आहे. निकामी झालेले स्पेअर पार्ट मिळण्याची महापालिकेलाही खात्री नाही. या घड्याळाच्या दुरुस्तीचा खर्च सद्य:स्थितीत 2 लाखांपेक्षा अधिक आहे. वेळीच पावले उचलली गेली नाही तर हाच खर्च दुपटीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
स्थानिकांकडून अपेक्षा नाहीत - घड्याळाची दुरुस्ती अत्यंत धाडसी आहे. त्याचे स्पेअर पार्ट इतके अवाढव्य आहेत, की दोन-चार माणसांना सहजपणे हाताळणे अशक्य आहे. त्यामुळे दुरुस्तीचे आव्हान स्वीकारण्यासाठी कारागीर सहज तयार होत नाहीत. सराफ बाजारातील एका कारागिराने तयारी दाखवली होती. मात्र, वयस्कर असल्याने या कारागिराने माघार घेतली. कारण टॉवरवर चढणे आणि स्पेअर पार्ट हाताळणे सोपे नसल्याने त्याने नकार दिला. त्यामुळे महापालिका स्थानिक कारागिरांच्या शोधात असली तरी कारागीर मिळतीलच याची खात्री महापालिकेलाच नाही.
काळजी घेण्याकडे दुर्लक्ष - हे घड्याळ 1968 ते 1972 दरम्यान सुरू करण्यात आले. त्या वेळी अत्याधुनिक साधने नव्हती. माझं घड्याळाचं छोटंसं दुकान होतं. चावी देण्यासाठी साखळीला दर आठ दिवसांनी वायंडिंग केलं जायचं, जे काम माझ्याकडेच होतं. आता माझं वय 83 वर्षांचं झालं आहे. मला फारसं दिसतंही नाही. पण आताच्या महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घड्याळ बंद पडल्याचं दु:ख होत आहे. कोणीच त्याच्या दुरुस्तीकडे पाहत नाही. सरकारी काम काय असते तुम्हाला माहितीच आहे. वेळीच काळजी घेतली असती तर ही परिस्थिती आली नसती. मानसिंग राजपूत, माजी नगरसेवक (1972-1994)

कारागिराचा शोध सुरू आहे - मागे विषय झाला होता. दुरुस्ती करणाराच येत नाही आणि दुरुस्ती करण्याची रिस्कही असल्याने हा प्रश्न मागे पडला आहे. मी पदभार स्वीकारल्यानंतर त्यावर विचारलंही होतं. पण एक- दीड महिन्यात काहीही कार्यवाही झालेली नाही. लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ. विष्णू भंगाळे, महापौर
प्रयत्न सुरू आहेत
- नाशिकमधील एका कारागिराने उत्सुकता दाखवली होती. मात्र, पेमेंटची हमी मिळत असेल तरच दुरुस्त करीन, अशी त्याची मागणी होती. रमेश जैन यांच्याशी त्याची भेटही घालून देणार होतो. बरेलीच्याही एका बच्चन नावाच्या कारागिराने यापूर्वी दुरुस्ती केली होती. मात्र, तो आता कुठे गेला सांगता येत नाही. कारण पत्र त्याच्या पत्त्यावर जात नाही आणि फोनही लागत नाही. नाशिकच्या कारागिराकडून अपेक्षा आहेत. नाही तर नव्याने टेंडर काढावे लागतील. अरुण पाटील, लाईट विभाग प्रमुख, महापालिका, जळगाव
महत्त्वपूर्ण वास्तू - शास्त्री टॉवरच्या घड्याळाने जळगावच्या लौकिकात भर टाकली असतानाही महापालिकेच्या लेखी या भव्य वास्तूची काहीही किंमत नाही. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अवघी काही वर्षे बाकी असताना या घड्याळाने आताच मान टाकली आहे. या घड्याळासारख्या राज्यात अनेक वास्तू आहेत, ज्यांची जपणूक अतिशय चांगल्या प्रकारे घेतली जात आहे. औरंगाबाद शहरातील दोन घड्याळे आहेत, ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे, तर हैदराबाद शहरात सालारजंग संग्रहालयात अशा वस्तू काळजीपूर्वक जपल्या आहेत.