आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीचा मार्ग झाला मोकळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील सुमारे १०३ वर्षे जुना शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीचा मार्ग माेकळा झाला अाहे. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार महापालिकेनेही कामासाठी ना-हरकत दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेनंतर लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाणार अाहे. खान्देश सेंट्रलमधून रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाच्या बदल्यात रेल्वे प्रशासनाने पार्किंगसाठी जागेची मागणी केल्याने त्यावर जुलै महिन्यात ताेडगा निघण्याची शक्यता अाहे. 
 
रेल्वे प्रशासनाचे डीअारएम अार. के. यादव यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलासह रेल्वेस्थानक खान्देश सेंट्रल माॅलकडून रेल्वेस्थानकाकडे येणाऱ्या रस्त्याची पाहणी केली. या वेळी महापौर नितीन लढ्ढा यांनाही चर्चेसाठी अामंत्रित करण्यात अाले हाेते. रेल्वे प्रशासनाला शिवाजीनगर उड्डाण पुलाची उभारणी करायची अाहे. त्यासाठी पालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे, अशी विनंती करण्यात अाली. शिवाजीनगर पुलासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापाैरांना सांगितले. त्याचप्रमाणे अासाेदा रेल्वे गेटवर देखील लवकरच पुलाची उभारणी करणार असल्याचे सांगितले. या वेळी भाेईटेनगर रेल्वे गेटवर उड्डाण पुलासाठी पालिकेने ५० टक्के खर्च करण्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु पालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याने खर्च करणे अवघड असल्याचे महापाैर लढ्ढा यांनी सांगितले. त्यामुळे अार्थिक परिस्थिती खराब असल्याचे पत्र देण्याची सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले. ते पत्र शासनाकडे पाठवून मार्ग काढला जाणार अाहे. 
 
 मागच्या महिन्यात केली होती पाहणी 
गेल्या महिन्याच्या १८ तारखेला जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली होती. या वेळी रेल्वेस्टेशनकडे जाण्याकरिता पर्यायी रस्ता मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनाला आठ दिवसांत निर्णय घेण्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले होते. मात्र, एक महिना उलटूनही त्यावर निर्णय झाला नाही. हा मार्ग व्हावा, यासाठी स्थानिक आमदार, खासदारांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याबाबत डीआरएम यादव, महापौर नितीन लढ्ढा, रेल्वेचे वरिष्ठ डीईएन दीपककुमार, वरिष्ठ व्यवस्थापक सुनील मिश्रा, उपमुख्य अभियंता रोहित थावरे, रेल्वे स्टेशन प्रबंधक एस. ई. कुलकर्णी, पीआरआय जीवन चौधरी, निरीक्षक जी. एस. सोनोनी यांनी या ठिकाणावरून मार्ग कसा काढता येईल, या विषयी चर्चा केली.
 
अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ 
रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी एका दादऱ्याची निर्मिती केली जाणार असून पार्सल कार्यालयही हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, डीआरएम यांनी कोणतीही सूचना देता, थेट भेट दिल्याने रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. डीआरएम येताच, रेल्वेस्थानकावर साफसफाईची कामे वेगात सुरू झाली. 
 
रेल्वेला हवी पार्किंगसाठी जागा 
गाेविंदा रिक्षा स्टाॅपकडून खान्देश सेंट्रल माॅलकडून रेल्वेस्थानकाला जाेडला जाणाऱ्या रस्त्यावर लिफ्टची उभारणी सुरू अाहे. या ठिकाणी प्रवाशांची ये-जा सुरू राहील. त्यात चार चाकी वाहनांची पार्किंग असल्याने अपघाताची शक्यता अाहे. त्यामुळे पार्किंगच्या जागेचा प्रश्न सुटेपर्यंत पर्यायी मार्गाचा ताेडगा निघणे अवघड असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे हाेते. दरम्यान, डीअारएम यादव यांनी खान्देश सेंट्रल माॅलमधील १५० बाय ३० चाैरस मीटर जागा चारचाकी पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु ती खासगी जागा असल्याने भूसंपादित करावी लागेल, असा मुद्दा महापाैर लढ्ढा यांनी उपस्थित केला. या वेळी डीअारएम खान्देश सेंट्रलचे संचालक अाशिष जैन यांचेही बाेलणे झाले. पर्यायी मार्गासंदर्भात ११ जुलैनंतर बैठक घेऊन ताेडगा काढण्यात येणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...