आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Solder Dead In Uttarakhand Helicopter Crash

मुले देशासाठी कुर्बान, शहीद गणेश अहिररावच्या वडिलांच्या भावना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तराखंडातील गौरीकुंड येथे मदतकार्य करणार्‍या जवानांचे हेलिकॉप्टर कोसळून मंगळवारी 20 जणांचा मृत्यू झाला. यात जळगाव व धुळे जिल्हय़ातील दोन जवानांचा समावेश आहे. चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील गणेश अहिरराव शहीद झाल्याचे कळताच दु:खात बुडालेल्या त्यांच्या वडिलांनी काही क्षणांतच स्वत:ला सावरत शहीद मुलाबद्दल अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद (जि. धुळे) येथील शशिकांत रमेश पवार यांनाही वीरमरण आले आहे.

गणेश शहीद झाल्याची बातमी कळताच अहिरराव कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला होता. धाय मोकलून रडणारे त्यांचे वडील हनुमंतराव मात्र काही वेळातच सावरले. ‘आपल्याला आपल्या शूर मुलाचा अभिमान आहे,’ असे ते म्हणू लागले. त्यांच्या सांत्वनासाठी आलेल्या काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या दुसर्‍या मुलाच्या भविष्याविषयी विचारताच या वीरपित्याचा देशाभिमान उफाळून आला. ‘मोठा मुलगा शहीद झाला म्हणून काय झाले? धाकटा मुलगा सीमेवर पहारा देतच राहील आणि देशाची सेवा करीतच राहील. ही मुले देशासाठीच दिली आहेत,’ असे त्यांनी निर्धाराने सांगितले. ‘देशासाठी सैन्यात सेवा द्यायची आणि प्रसंगी बलिदान द्यायचे ही आमच्या गावाची परंपरा असून ती सुरूच राहील,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दीड वर्षाचा ओम पोरका : शशिकांत पवार यांचा 6 डिसेंबर 2007 रोजी सोनाली यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षाचा ओम हा मुलगा आहे. शशिकांतच्या वीरमरणामुळे ओम व सोनालीचा आधार निखळला आहे.

दोन्ही गावे सैनिकांची
शहीद गणेश यांचे वडाळा-वडाळी हे गाव सैनिकांचे गाव आहे. 2010 मध्ये याच गावातील सोपान आमले हा जवान शहीद झाला होता. तर शहीद शशिकांत पवार याचे बेटावद (तालुका शिंदखेडा) हे गावही सैनिकांचे गाव म्हणूनच ओळखले जाते. गावातले 20 तरुण सैन्यात आणि निमलष्करी दलात सेवा देत आहेत.

कुटुंबीयांना कल्पनाच नाही
गणेश शहीद झाल्याची माहिती मंगळवारी रात्रीच वडाळा-वडाळी गावात कळवण्यात आली होती. मात्र, ही दु:खद घटना त्याच्या आई-वडिलांना सांगण्याचं धारिष्ट कोणातच नव्हतं. आयटीबीपीतच असलेला गणेशचा लहान भाऊ मंगळवारी सायंकाळीच लखनऊकडे निघाला होता. त्याला मित्रांनी फोन करून परत बोलावलं खरं; पण त्यालाही खरं कारण कोणी सांगू शकलं नाही. वडील आजारी झाल्याचं त्याला सांगण्यात आलं. त्याचे कुटुंबीय हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची आणि 20 जवान शहीद झाल्याची बातमी पाहत होते; पण त्यात गणेश असेल याची त्यांना पुसटशीही कल्पना आली नाही. सकाळी सारा गाव शोकमग्न होता. पण ही शोककळा कसली आहे हे गणेशच्या वडिलांना समजत नव्हतं. शेवटी 11 वाजेच्या सुमारास त्यांना सरपंचांनी गणेशला वीरमरण आल्याची कल्पना दिली.

दोन्ही जवानांमध्ये साधम्र्य
शहीद दोन्ही जवान एकमेकांशी कोणत्याही अर्थाने संबंधित नसले तरी दोघांमध्ये साधम्र्य खूप आहे. दोघांचीही 2004 मध्ये जळगावात झालेल्या प्रक्रियेत आयटीबीपीएफमध्ये भरती झाली होती. दोघेही विवाहित असून दोन्ही गावांत सैन्यातील सेवेचा वारसा आहे. गणेशचा भाऊ निमलष्करात असून शशिकांतचे काका सैन्यातून निवृत्त झाले आहेत. उत्तराखंडमधील मदतकार्य संपल्यानंतर गणेश घरी येणार होता, तर शशिकांत अफगाणिस्तानात शांती सैनिक म्हणून जाणार होता.