आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Spot Issue, Information Bye Prabhakar Nike

स्फोटाने हादरले होते जळगाव; प्रभाकर नाईक यांनी उलगडला 1975 चा थरारक पट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- 9 जानेवारी 1975. स्थळ जळगावचे रेल्वेस्थानक. 37 वर्षांपूर्वी 75 टँकरची ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी मालगाडी धाडधाड करीत मुंबईवरून जळगावात येत होती. मात्र, अचानक एका डब्याला आग लागली. गार्डला समजल्याबरोबर त्याने धोक्याची सूचना जळगाव रेल्वेस्थानकाला दिली. संपूर्ण मालगाडीच ज्वलनशील पदार्थांनी भरलेली होती. त्यामुळे आग विझविणेही शक्य नव्हते. ज्या टँकरला आग लागली होती तो वेगळा केला; पण स्फोट रोखता आला नाही. संपूर्ण जळगाव हादरले, लोहमार्ग तुटले, तर केळीच्या बागा खाक झाल्या. एका डब्यामुळे हा थरार निर्माण झाला होता.
‘दिव्य मराठी’ने ‘जळगाव स्फोटाच्या उंबरठय़ावर’ हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शहरवासीयांची छाती दडपली होती. त्यावरून प्रभाकर नाईक यांनी 1975 मधील टँकर स्फोटाच्या घटनेच्या थरारक आठवणींचा पटच उलगडला. नाईक त्या वेळी रेल्वेचे इनडोअर स्टेशन मास्तर होते. त्यांच्यासह रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी जिवावर उदार होऊन मोठी दुर्घटना टाळली. त्या वेळी या सर्व रेल्वेच्या जिगरबाद टीमचे गौरवपत्र देऊन तत्कालीन नगराध्यक्ष स. ना. भालेराव यांनी सन्मानित केले होते.
बळीरामपेठ, शनिपेठला बसला होता हादरा
प्रभाकर नाईक गणपतीनगरमधील रहिवासी असून, रेल्वेचे निवृत्त सुपरिंटेडंट आहेत. नाईक म्हणाले, की 1975 मध्ये शहरात ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारी विशेष ट्रेन येत होती. ट्रेनच्या एका डब्याला आग लागल्यानंतर लाल बावटा दाखवून रेल्वे थांबविण्याची सूचना करण्यात आली. गाडी एक किलोमीटरवर म्हसावदजवळ थांबली. ट्रेनला आग लागलेली होती. ती विझवणे शक्य नाही. त्या वेळी ज्या डब्याला आग लागली तो डबा वेगळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रेन इंजिनने पुढील डबे भादलीकडे रवाना करण्यात आले, तर मागचे टँकर सेटिंग इंजिनने वेगळे करून शहरापासून लांब नेले. मात्र, हे करताना डबा वेगळा करण्यासाठी कर्मचार्‍यांनी जे धैर्य दाखवले ते कौतुकास्पद होते. कारण कोणत्याही क्षणी डब्याचा स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र, त्याचा विचार न करता कर्मचार्‍यांनी सांघिक प्रयत्नाच्या जोरावर पटापट निर्णय घेतले. सगळे टँकर सुरक्षित नेल्यानंतर टँकरचा स्फोट झाला तेव्हा प्रचंड आवाज झाला.
केळीच्या बागा खाक झाल्या. लोहमार्ग तुटले, वाकले. बळीरामपेठ, शनिपेठला हादरा बसला. मात्र, जीवितहानी झाली नाही, तर स्टेशनपासून दूरवर हा स्फोट झाल्याने मोठी हानी वाचली. कर्मचार्‍यांच्या समयसूचकतेबद्दल तत्कालीन नगराध्यक्ष स.ना. भालेराव यांनी गौरवपत्र दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी एस. डी. म्हस्के यांनी सर्व कर्मचार्‍यांना 26 जानेवारी 1975 ला सन्मानित करण्यात आले. त्यात प्रभाकर नाईक यांचा समावेश होता.
चार महिन्यांपूर्वीही वाचले जळगाव
2 जानेवारी 2012 रोजी दुपारी बारा वाजता जळगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 च्या डाव्या बाजूच्या फलाटावर भुसावळकडे जाण्यासाठी 48 डब्यांची पेट्रोल, रॉकेल वाहून नेणारी मालगाडी होती. अचानक एक जण या मालगाडीवर चढला. मात्र, वीजवाहिनीच्या धक्क्य़ाने तो जळाला आणि मालगाडीवरच पडला. त्यामुळे संपूर्ण मालगाडी पेट घेण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने पेटत्या मुलाला बाजूला केल्याने मोठी दुर्घटना टळली. 1975 नंतर तब्बल 37 वर्षांनी जळगाववर गुदरलेला हा दुसरा प्रसंग होता. यामुळे संपूर्ण जळगाव शहर हादरण्याचा धोका होता.
तो एक स्फोट शहारे आणणारा..
‘दिव्य मराठी’च्या वृत्ताने व्यवस्थेतील उणीवा समोर आणल्या. तीन दिवसांपासून ही समस्या उद्भवली असताना महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घ्यायला हवी होती. कारण 1975मधील शहारे आणणारा तो टँकरचा स्फोट बळीराम पेठ, शनिपेठला हादरे देऊन गेला. एका टँकरने जर शहर हादरवून सोडत असेल तर 60 टँकरमधील हजार टन गॅसमुळे या शहराचे काय होईल? याची कल्पनाच छाती दडपणारी आहे. प्रभाकर नाईक, निवृत्त रेल्वे सुपरीटेंडंट
भारत गॅसचा वजनकाटा गुरुवारपर्यंत बंद
वजनमापे विभागाने घेतला निर्णय
औद्योगिक वसाहतीतील बीपीसीएल प्लँटचा वजनकाटा सदोष असल्याचा आरोप करीत सुमारे 60 चालकांनी तीन दिवसांपासून पुकारलेला उत्स्फूर्त बंद आज मागे घेण्यात आला. चालकांनी सोमवारी सकाळी 10 वाजता वजनमापे विभागाला निवेदन दिल्यानंतर प्लँटमधील काट्यातील दोष आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी वजनमापे विभागाने कंपनीला वजनकाटा बंद करण्याची नोटीस दिली आहे. प्लँटने 25 टन वजनाची व्यवस्था करून दिल्यानंतरच वजनकाट्याची पडताळणी करता येईल, अशी माहिती विभागाचे निरीक्षक के. डी. पालिवाल यांनी दिली.
टँकरचालक व भारत गॅसच्या प्लॅंट प्रशासनात गेल्या चार दिवसांपासून वजनकाट्याच्या मुद्दय़ावरून धुसफूस सुरू होती. बंदमुळे हजार टन गॅसचे टँकर रस्त्यावरच उभे असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली होती.
टँकरचालकांचे निवेदन
बंदमध्ये सहभागी झालेल्या सर्व टँकरचालकांनी सोमवारी सकाळी 10 वाजता वजनमापे विभागाला निवेदन देत तपासणीची मागणी केली. वजनमापे विभागाने भारत गॅसच्या प्लँटमधील वजनकाट्याची पडताळणी करण्यासाठी 25 टन वजन पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे प्लँटला 25 टन वजन उपलब्ध करून देण्याची सूचना नोटिशीद्वारे करण्यात आली असून, तोपर्यंत वजनकाटा बंद करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यानंतरच वजनकाट्यात दोष आहे किंवा नाही, हे सांगता येईल.
चालकांमध्ये समाधान
खासगी वजनकाट्यावरून वजन करण्याचा निर्णय झाल्याने चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, सायंकाळी 5.30 वाजता बाहेरून वजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रात्री 9.15 वाजेपर्यंत टँकरमधून गॅस रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पडताळणीनंतरच निर्णय
वजनकाट्याबाबत पडताळणी करण्यासाठी प्लँटला तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्याप्रमाणे वजनकाटा तीन दिवस बंद ठेवण्यास सांगितले आहे. वजनकाट्याची आम्ही आज पाहणी केली असून, क्षमतेच्या निम्म्या वजनाची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच वजनकाट्यात दोष आहे किंवा नाही हे समजेल. के. डी. पालिवाल, निरीक्षक, वजनमापे विभाग.