आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Student Campus Interview News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस् इंटरव्ह्यूतून फसवणूक; स्पेक्ट्रम प्लॅनिंग सर्व्हिसेस कंपनीविरुद्ध विद्यार्थ्यांची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- परिसर मुलाखतींच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आॅफर लेटरमध्ये असलेल्या पत्त्यावर नमूद असलेल्या संबंधित कंपनीचे आॅफिस अस्तित्वात नसल्याची ओरडही फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

केसीई इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये गुजरातच्या बडोदा येथील स्पेक्ट्रम प्लॅनिंग सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरिता 13 जानेवारी 2014 रोजी परिसर मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रिकलच्या अंतिम वर्षातील 87 विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. त्यातील 28 विद्यार्थ्यांना आॅफर लेटरही देण्यात आले होते. ‘प्रशिक्षणार्थी साइट इंजिनिअर’ या पदासाठी निवडलेल्या या विद्यार्थ्यांना वर्षाचे 2.40 लाखांचे पॅकेज देण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना 14 जुलै 2014 रोजी रुजू करून घेतले जाणार आहे. मात्र, काही विद्यार्थी कंपनी पाहण्यासाठी बडोदा येथे गेले; परंतु त्यांना आॅफर लेटरमध्ये दिलेल्या पत्त्यावर संबंधित कंपनीचे कार्यालय आढळून आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संशय बळावला आणि त्यांनी वेबसाइट व फोन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथेही संपर्क झाला नाही. तसेच फोनही बंद आले. शेवटी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला असता, महाविद्यालयाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
प्रत्येकाकडून घेतले साडेसात हजार
प्रत्येक विद्यार्थ्याकडून संबंधित कंपनीने साडेसात हजार रुपयांचा धनादेश घेतला आहे. आॅफर लेटर घेतलेला उमेदवार नोकरी सोडून जाऊ नये याची हमी म्हणूून कंपनीने ही रक्कम घेतली. तसेच कंपनीत रुजू झाल्यानंतर तीन महिन्यांत ही रक्कम परत करू, असे कंपनीने विद्यार्थ्यांना सांगितले होते. आता नोकरीसोबत धनादेशाची रक्कमही बुडणार असल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
वेबसाइट अन् फोनही बंद
फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्यांनी मुलाखत घेणारे हकीम बिलाल यांच्याशी संपर्क साधला. ‘मी आता ती कंपनी सोडली असून, त्यांच्याशी माझा संबंध नाही. तुम्हाला याबाबत केस दाखल करायची असल्यास खुशाल करा’ असे बिलाल यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली.
आॅफिसचे स्थलांतर; पण पत्ता नाही
आॅफर लेटर घेतल्यानंतर काही विद्यार्थी बडोदा येथील संबंधित कंपनीच्या पत्त्यावर कार्यालय पाहण्यासाठी गेले; परंतु तेथे स्पेक्ट्रम कंपनीचे कार्यालय आढळून आले नाही. मात्र, कार्यालय स्थलांतरित झाल्याचा बोर्ड लावल्याचे दिसून आले; परंतु नवीन कार्यालय कुठे याबाबत कुठलीही माहिती न कळवल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहे. इंदूर येथेही या कंपनीकडून फसवणूक झाल्याची घटना यापूर्वी घडल्याचे समोर आल्याने विद्यार्थ्यांचा संशय अधिकच बळावला.
अन्य जणांचीही फसवणूक
दरम्यान, केसीईच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनादेखील या कंपनीने आॅफर लेटर दिले आहे. याव्यतिरिक्त शिरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासह अन्य जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाही या कंपनीने गंडा घातल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
फसवणूक झालेल्यांना मदत करणार
४परिसर मुलाखतींसाठी संस्थेने विद्यार्थ्यांना दालन उपलब्ध करून दिले आहे. मात्र, कंपनी आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेली चर्चा व अटींशी आमचा संबंध नाही. आम्ही तसा बॉण्डही विद्यार्थ्यांकडून लिहून घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असल्यास त्यांना मदत करण्याची आमची तयारी आहे.
मानव ठाकूर, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट आॅफिसर, केसीई इंजिनिअरिंग