आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्ग होणार सहापदरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव ते भुसावळदरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाऐवजी सहापदरी होण्याचे संकेत आहेत. औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबतचा प्रस्ताव दिल्ली दरबारात पाठवला आहे. प्रस्तावाला लवकरच तत्वत: मंजुरी मिळणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. धुळे-अमरावती मार्गावरील केवळ जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण होणार असल्याने अपघातांवर नियंत्रण येईल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते भुसावळ या २३ किलोमीटर अंतरात वाहतूक जास्त आहे. परिणामी अपघात होण्याचेही प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याऐवजी सहापदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होती. याबाबत औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अनुकूल असल्याने या मार्गाला मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीला चौपदरीकरणाचे काम दिले होते. कामास प्रत्यक्षात उशीर होत असल्याने एल अॅण्ड टीने काम करण्यास नकार दिला. यानंतर प्राधिकरणानेही एल अॅण्ड टीला टर्मिनेट केले होते. आता धुळे ते अमरावतीदरम्यान होणाऱ्या चौपदरीकरण आणि जळगाव ते भुसावळ दरम्यान होणाऱ्या सहापदरीकरणाच्या कामाचे नवीन टेंडर निघणार आहे.

राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी पालकमंत्री संजय सावकारे यांनी जळगाव-भुसावळ महामार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते. खडसे यांनी याबाबत औरंगाबाद प्राधिकरण कार्यालयास प्रस्तावाबाबत आदेशित केले होते. आता हा प्रस्ताव दिल्ली दरबारातून मंजूर करण्यासाठीही खडसे प्रयत्नशील आहेत.

महामार्गाचे चौपदरीकरण करणे ही प्रक्रिया कालबाह्य झाली आहे. जिल्ह्यातील महामार्गदेखील सहापदरी होणे आवश्यक आहे. जलद गतीने वाहतूक, स्थानिक भागासाठी स्वतंत्र लेन असल्यास अपघातांचे प्रकार थांबतील. पहिल्या टप्प्यात जळगाव ते भुसावळदरम्यान सहापदरी मार्ग झाल्यानंतर आगामी काळात हा प्रयोग जिल्ह्यासह धुळे - अमरावती मार्गासाठी वापरला जाण्याचेही चिन्हे आहेत.

जळगाव भुसावळ शहरातून उत्तरभारत आणि पश्चिम भारतात जाण्याचे रस्ते आहेत. जळगाव ते भुसावळदरम्यान रेल्वेचा दुहेरी मार्ग आहे. रेल्वेची वाढलेली वाहतूक पाहता तिसऱ्या रेल्वेलाइनचा प्रस्ताव होता. मात्र, त्यास मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नाही. महामार्ग सहापदरीकरण झाल्यास बरीचशी माल आणि प्रवासी वाहतूक महामार्गावरून वळू शकते.

टेंडरनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार
*राष्ट्रीयमहामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी असलेली नवीन टेंडरप्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. यासाठी सुधारित अहवाल पाठवला आहे. जळगाव ते भुसावळदरम्यानचा मार्ग सहापदरीकरण करण्यात यावा, असा प्रस्तावदेखील पाठवण्यात आला आहे. केंद्राकडून तो मंजूर झाल्यास टेंडर प्रक्रियेनंतर कामाला सुरुवात होईल. यू.जे. चामरगोरे, प्रकल्पसंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,औरंगाबाद

केंद्र शासनाकडून मिळणार मंजुरी
*जळगावजिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग सहापदरी असावा, याबाबत आपण पालकमंत्री असताना मागणी केली होती. विशेषत: जळगाव ते मुक्ताईनगर यादरम्यान सिक्सलेनची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही सातत्याने पाठपुरावा केल्याने प्राधिकरणाने प्रस्ताव पाठवला आहे. एकनाथ खडसेंच्या माध्यमातून दिल्लीतून पाठपुरावा करून त्यास मंजुरी मिळेल. संजयसावकारे, आमदार,भुसावळ
असा असेल प्रस्तािवत महामार्ग
जळगावते भुसावळदरम्यानच्या तब्बल २३ किलोमीटर अंतरात चारपदरी रस्त्यावरून मुख्य वाहतूक होईल तर उर्वरित अन्य दोन्ही रस्त्यावरून स्थानिक भागातील वाहतूक होईल. चारही रस्ते प्रशस्त आणि डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाचे असतील. यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढेल. रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये फुलझाडे तर दोन्ही बाजूंनी स्थानिक वृक्षांची लागवड होईल. मुख्य मार्गावरून अवजड वाहतूक होईल. वाहतूक जलद होणार असल्याने वेळेचा अपव्यय टळेल. आैद्याेिगक िवकासालाही काही अंशी हातभार लागून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.