जळगाव - नगर रचना सहायक संचालकांच्या बचावासाठी स्वाक्षरी करणाऱ्या सहा अभियंत्यांच्या निलंबन ठरावावरून महापालिकेचे वातावरण ढवळून निघाले अाहे. निलंबनाएेवजी साैम्य कारवाई करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी अापल्या मर्जीतील नगरसेवक अाणि जिल्ह्यातील काही बड्या राजकारण्यांकडून शिफारशी करणे सुरू केले अाहे.
दरम्यान, जळगाव महापालिका नकाे, यासाठी सहायक नगररचना संचालक पुढील अाठवड्यात राज्य शासनाकडे जाणार अाहेत. नगररचना सहायक संचालकांच्या बचावासाठी अायुक्तांना पत्र दिल्याच्या कारणावरून सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा ठराव महासभेत केला अाहे. सभेचे इतिवृत्त लिखाण पुढील तांत्रिक प्रक्रिया हाेण्यासाठी किमान अाठ दिवसांचा कालावधी लागताे.
महासभेचा ठराव प्रथम महापाैरांकडे त्यानंतर अंमलबजावणीसाठी अायुक्तांकडे येईल. अायुक्त या ठरावाच्या दृष्टीने अास्थापना विभागाकडून अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करतील. यादरम्यान, झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली असून निलंबनाएेवजी साैम्य कारवाई करण्यासाठी अधिकारी फिल्डींग लावत अाहेत. या सर्व प्रकरणात नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम पुढील अाठवड्यात नगररचना संचालकांची भेट घेऊन बदलीची मागणी करणार अाहेत. ताेपर्यंत नगर भूमापन विभागाच्या कामासाठी दिवसातील सहा तास उर्वरित वेळ महापालिकेस देण्याची त्यांची मानसिकता अाहे.
सर्व अधिकारी कार्यरत : महासभेत बुधवारी रचना सहायक अरविंद भाेसले, याेगेश वाणी, नरेंद्र जावळे, कनिष्ठ अभियंता सतीश परदेशी, गाेपाळ लुले, संजय पाटील यांना निलंबित करण्याचा ठराव करण्यात अाला अाहे. ठराव केल्यानंतर अावश्यक तांत्रिक गाेष्टींची पूर्तता हाेणे बाकी असल्याने तूर्त सर्व अधिकारी अापापल्या जबाबदाऱ्या सांभाळत अाहेत.
पुढे काय?
बुधवारी झालेल्या महासभेचे इतिवृत्त लिखाणाचे काम सध्या सुरू अाहे. रविवार अन् साेमवारी सुटी असून बुधवार किंवा गुरुवारपर्यंत हे काम पूर्ण हाेण्याची शक्यता अाहे. इतिवृत्तात सभागृहात नेमकी काय मागणी झाली हाेती? याचा अभ्यास केला जाईल. यानंतर कायदेशीर बाबींची पडताळणी करून प्रशासनातर्फे पुढील कार्यवाही केली जाईल.
काम करण्याची मानसिकता नाही
जळगाव महापालिकेच्या बदलीसाठी यापूर्वीच वरिष्ठांना विनंती केली हाेती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. प्रामाणिकपणे काम करूनही अशा प्रकारे त्रास हाेत असल्याने माझी मानसिकता खराब झाली अाहे. शासनाच्या नगररचना विभागाच्या संचालकांची या प्रकरणी लवकरच भेट घेणार अाहे. या भेटीत प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे, छायाचित्र सादर करून माझी बदली करून नवीन अधिकारी देण्याची मागणी करणार अाहे. बदलीचे अादेश तातडीने निघाले नाही तर नाईलाजास्तव काम करावेच लागेल. चंद्रकांतनिकम, सहायकसंचालक, नगररचना
ठराव प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई
महासभा नियुक्ती प्राधिकरण असते. कुठलाही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला महासभा मान्यता देत असते. महासभेच्या ठरावाच्या अंमलबजावणीसंदर्भातील अधिकार हे विशेष अधिकारी या नात्याने अायुक्तांना असतात. महासभेने केलेला ठराव अद्याप प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. ताे प्राप्त झाल्यावर निलंबनासंदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल. अविनाश गांगाेडे, उपायुक्त,अास्थापना