आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव स्फोटाच्या उंबरठय़ावर....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव औद्योगिक वसाहतीतील बीपीसीएल प्लँटमध्ये रोज 15 टँकरमधील गॅस रिकामा केला जातो. याच प्लँटमधून खान्देशासह मराठवाडा, विदर्भातील एकूण 13 जिल्ह्यांतील एकूण 9 लाख ग्राहकांना गॅसचा पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेल्या भारत गॅस कंपनीच्या या प्लँटमध्ये गुजरात, मुंबईमधून गॅसचे टँकर रिकामे केले जातात. मात्र, वजनकाटा सदोष असल्याचा आरोप करीत टँकरचालकांनी टँकरमधील गॅस रिकामा करण्यास स्पष्टपणे नकार देत गुरुवार, 2 जुलैपासून टँकर प्लँटसमोरील रस्त्यावरच उभे केले आहेत. त्यामुळे सुमारे 1000 टन गॅसच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या टँकरपासून विजेच्या तारा अवघ्या हाताच्या अंतरावर असून, रात्री पथदिवेही नसल्याने अंधारात एखादे वाहन टँकरवर धडकल्यास संपूर्ण शहरच स्फोटाच्या टप्प्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, असे असताना टँकरचालक व कंपनी प्रशासन आपल्या मुद्दय़ावर अडून बसल्याने स्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.
काय आहे तिढा?
बीपीसीएल प्लँटमध्ये वजनकाटा सदोष असल्याचा आरोप टँकरचालकांनी केला आहे. या प्लँटमध्ये रोज 15 टँकर गॅस रिकामा केला जातो. मात्र, टँकरमधील गॅसच्या वजनात सुमारे 60 ते 200 किलो तूट येत आहे, जी निर्धारित तुटीपेक्षा पाच पटीने अधिक आहे, असा टँकरचालकांचा आरोप आहे. या तुटीची रक्कम चालकांच्या पगारातून 70 रुपये किलोप्रमाणे कापली जाते. त्यामुळे काहींना पगार मिळत नाही, तर काही चालकांचा पगार वाहतुकीतच जात आहे. याच मुद्दय़ावरून टँकरचालकांनी गॅस प्लँटमध्ये रिकामा करण्यास नकार दिला. जोपर्यंत वजनकाटा बदलला जात नाही तोपर्यंत टँकर प्लँटबाहेरच उभे राहतील, अशी भूमिका चालकांनी घेतली आहे.
शहराला स्फोटाचा धोका
तीन दिवसांपासून चालकांनी गॅसने भरलेले टँकर प्लँटसमोरील रस्त्यावरच दुतर्फा उभे केले आहेत. सुमारे 60 टँकर रस्त्यावरच उभे असून, त्यात एकूण 1000 टन गॅस आहे. त्यामुळे अन्य वाहन जाण्यासाठी रस्ता अरुंद झाला आहे. टँकरपासून हाताच्या अंतरावर वीजवाहक तारा आहेत. पथदिवे पुरेसे नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे एखादे नियंत्रण सुटलेले वाहन गॅस टँकरवर आदळल्यास मोठा स्फोट होऊन एमआयडीसीच नव्हे, तर संपूर्ण शहरच हादरण्याची भीती आहे. सुरक्षाच राम भरोसे असल्याने टँकरचा स्फोट होणार नाही याची कोणीही खात्री देऊ शकत नाही.
वजनकाटा सदोषच
आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे, की वजनकाटा सदोषच आहे. आम्ही कोणतीही गडबड केलेली नाही. सर्वच टँकरमध्ये तूट प्रमाणापेक्षा अधिक कशी असू शकेल? वजनकाट्यावर कुठेही गाडी उभी केली तरी वजन सारखेच दाखवत नाही. बाहेर वजन करून पाहा. सत्य समोर येईल. वजनकाट्यातच दोष आहेत हे सिद्ध होईल. टँकरचालक
ग्राहकांना बसेल फटका
कदाचित चालकांचे राजकारणही असू शकेल. सध्या तरी कोणतीही अडचण आलेली नाही. मात्र, आणखी दोन दिवस प्लँटवर गॅस रिकामा केला गेला नाही तर घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना फटका बसू शकतो. कारण आठवडाभरात एकूण ग्राहकांपैकी 60 टक्के ग्राहकांचा गॅस संपतो. त्यामुळे पुढे अडचण उद्भवू शकते. दिलीप चौबे, रेखा गॅस एजन्सी, जळगाव
गॅस सिलिंडरची वितरण व्यवस्था कोलमडणार
आणखी दोन दिवस हा तिढा सुटला नाही तर 13 जिल्ह्यांतील सुमारे 9 लाख घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना याचा फटका बसेल, ज्यात जळगाव शहरातील एकूण 85 हजार ग्राहकांचा समावेश आहे. साधारणपणे एका आठवड्यात 60 टक्के ग्राहकांचा गॅस संपतो. त्यामुळे आणखी 2 दिवस तोडगा न निघाल्यास वितरण व्यवस्था कोलमडू शकते.
प्रशासनाकडून तोडग्याचे प्रयत्न असफल
वजनकाट्याच्या मुद्दय़ावरून बीपीसीएल कंपनी प्रशासन व टँकरचालक आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. कंपनी प्रशासनाने याबाबत चालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात अयशस्वी ठरली आहे. जर वजनकाट्यात दोष नसेल तर कंपनीने अन्य ठिकाणी वजन करून ते कंपनीच्या काट्यावरील वजनाशी पडताळून पाहायला हवे. मात्र, असे न करता कंपनीने वजनकाटा योग्यच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
टँकरचालकांचे काय आहेत मुद्दे?
चालकांच्या म्हणण्यानुसार, वजनकाट्यावर गाडी कुठेही उभी केली तर वजन वेगवेगळे येते. दोन फुटांवर वजनात फरक येतो. जेथे कमी वजन भरते तेथे वाहन उभे करण्यास सांगितले जाते. मात्र, थोडेसे पुढे उभे केले तर वजन योग्य येते. जर वजनकाटा योग्य असेल तर वाहन कुठेही उभे केले तरी वजनात फरक यायला नको. मग या वजनकाट्यावर फरक का येतो, असा प्रश्न टँकरचालकांनी उपस्थित केला आहे.
भारत गॅस कंपनी प्रशासनाचे काय आहे म्हणणे ?
वजनकाट्यात कोणताही दोष नाही. जळगावातील प्लँट 1988 पासून आहे, ज्याच्याबाबत कोणत्याही तक्रारी नव्हत्या. चालकांचे दुखणे वेगळेच आहे. यापूर्वी 100 किलोग्रॅम गॅसची तूट ग्राह्य धरली जात होती. दोन-तीन महिन्यांपासून ही तूट 40 किलोग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. तेव्हापासूनच चालकांनी वाद घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या निर्धारित तुटीपेक्षा अधिक तूट येत असल्यानेच चालकांनी बहाणा सुरू केला आहे.
टँकरचालक खोटे बोलत आहेत!
जळगावातील बीपीसीएल प्लँटचे टेरिटरी मॅनेजर यांच्याशी थेट सवाल.
> वजनकाटा सदोष असल्याचे टँकरचालकांचे मत आहे. खोटे बोलत आहेत ते. वजनकाट्यात कोणतीही चूक नाही.
> सर्वच टँकरमध्ये 150 ते 200 किलोपर्यंत तूट कशी काय येते? असे काहीही नाही. सर्वच टँकरमध्ये नाही. मात्र, काही चालक गडबड करीत असतील, म्हणूनच तूट येते.
> वजनकाटा योग्य आहे, याची खात्री पटवून देण्यासाठी इतर ठिकाणी वजन करून का पाहिले जात नाही? बाहेरूनही केले जाऊ शकते; पण वजनकाट्यात काहीही दोष नाहीत. यापूर्वी आपण बाहेरूनच करीत होतो. मात्र, चालक मुद्दाम अशी भूमिका घेत आहे.
> कशामुळे चालकांनी हा पवित्रा घेतला? यापूर्वी 100 किलोची तूट ग्राह्य धरली जात होती. मात्र, दोन-तीन महिन्यांपासून 40 किलोची तूट ग्राह्य धरली आहे. त्यामुळे चालकांनी हे बहाणे सुरू केले आहेत. खरे कारण हेच आहे.
> हा तिढा सोडविण्यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहात? आम्ही खूप समजावले, पण कोणीही समजून घेत नाही. 25 वर्षांपासून हा प्लँट सुरू आहे. सोमवारी यावर पुन्हा चर्चा करू.