आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या मानगुटीवर वाघूर प्रकल्पाचे भूत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तत्कालीन नगरपालिकेने राबवलेल्या घरकुल प्रकरणाचा तपास पूर्ण होत आलेला असतानाच पोलिस विभागाने आता वाघूर प्रकल्पाची इत्थंभूत माहिती महापालिकेकडून मागवली आहे. महापालिकेत आठवडाभरापासून अतिशय गुप्त पद्धतीने वाघूर योजनेशी संबंधित कागदपत्रांची जमवाजमव सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडे ही कागदपत्रे गेल्यावर घरकुलाच्या कारवाईतून बचावलेल्या विद्यमान महापौरांसह या ठरावाच्या बाजूने मतदान केलेली नगरसेवक मंडळी हादरली आहे.
जळगाव शहरास पुढील 50 वर्षांचा विस्तार डोळ्यासमोर ठेवून पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने तत्कालीन नगरपालिकेने वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना राबवली होती. त्यासाठी 159 कोटी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. जळगाव नगरपालिकेने 24 एप्रिल 1999 रोजी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी हुडको व जिल्हा बॅँकेकडून कर्ज घेण्यात आले. तसेच शासनाकडूनही अनुदान मिळाले होते. नऊ वर्षांनंतर ही योजना पूर्णत्वास येऊन सन 2008मध्ये जळगावात पाणी पोहोचले. तथापि, ही योजना पूर्ण करताना नियमबाह्य कामांचा आरोप झाल्याने जोशी समिती आणि सावंत आयोगामार्फत यापूर्वीच चौकशी होऊन ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात नूतन पोलिस अधीक्षकांनी जळगाव शहर पोलिस ठाण्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी महापालिकेकडून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी केल्याने झेरॉक्स काढण्याचे काम गुप्त पद्धतीने सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रभारी आयुक्त सोमनाथ गुंजाळ यांच्याकडे विचारणा केली असता, मी बाहेरगावी असल्याने आता काहीच सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादांना दुसरा झटका - आमदार सुरेश जैन यांनी वाघूर पाणीपुरवठा योजनेत पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप उल्हास साबळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला. जैन यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.साबळेंच्या आरोपात तथ्य असल्यास ‘दादां’ना घरकुल पाठोपाठ वाघूर घोटाळय़ाचा झटका बसणार आहे. जैन जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना वाघूर प्रकल्पाशी संबंध नसलेल्या खान्देश बिल्डर्सला वाघूर योजनेसाठी घेतलेल्या कर्जातून 15 कोटी 64 लाख 13 हजार सातशे रुपये बिनव्याजी अँडव्हान्स देण्यात आले होते.
वाघूर प्रकल्पासंदर्भात जळगाव शहर पोलिसांनी महापालिकेकडून सर्व कागदपत्रे मागवली असून, मनपाकडून ती देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. 1999पासूनची माहिती शोधून देणे कठीण काम असल्याने ती देण्यास उशीर लागणार, याची कल्पना आपण दिली आहे. त्यामुळे पोलिसांकडून 15 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. शशिकांत बोरोले, प्रकल्प अधिकारी, मनपा
ड्रेनेजचे पाइप पिण्यासाठी - धरणापासून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी पहिल्या टप्प्यात 22 कि.मी. अंतराची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. राज्यभरात पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकताना ती बिडाची किंवा लोखंडी असते; मात्र या ठिकाणी 1500, 1200 व 1000 मि.मी. व्यासाची सिमेंटची पाइपलाइन टाकण्यात आली आहे.
बिनव्याजी अग्रीम -, मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम देण्यात आलेल्या तापी प्रेसट्रेस कंपनीला बिनव्याजी अग्रीमची रक्कम देण्यात आली होती. तसेच मक्ता देताना येथेही आमदार सुरेश जैन यांनी हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.