आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्वरित काम केल्यास मक्तेदाराला मिळणार दोन टक्के ‘इन्सेंटिव्ह’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाघूरची पातळी झपाट्याने खालावत असल्याने ‘डाऊन स्कीम’चे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. या कामासाठी पुढे आलेल्या मक्तेदाराने तीन महिन्यांच्या आत काम पूर्ण केल्यास त्याला एकूण रकमेवर दोन टक्के इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. मक्ते दाराने हे आव्हान स्वीकारत तातडीने योजना पूर्ण केल्यास त्याला 3 लाख 43 हजारांचा फायदा होणार आहे.

पालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शनिवारी सकाळी सभापती रमेश जैन यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत वाघूर धरणावर प्रस्तावित असलेल्या डाउन स्कीमसाठी प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेल्या मक्तेदारास काम देण्यास मंजुरी देण्यात आली. काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असली तरी वेळेच्या अगोदर काम करून दिल्यास मक्तेदाराला दोन टक्के इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय झाला.

वाहनांसाठी शेडची केली मागणी

डाऊन स्कीम या योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण योजना विभाग यांची नेमणूक करण्यासाठी लागणार्‍या खर्चास मान्यता देण्यात आली. व्यासपीठावर प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे, प्रभाग अधिकारी अविनाश गांगोर्डे, नगरसचिव गोपाल ओझा होते. पालिकेच्या आवारात लागणार्‍या वाहनांसाठी शेड तयार करण्याची मागणी गणेश सोनवणे यांनी केली. सतरा मजलीत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी इब्राहीम पटेल यांनी केली.

पालिकेतून ‘आधार’ इतरत्र हलवणार

आधार नोंदणीसाठी नागरिकांची गैरसोय होत असल्याने शहरात अन्य ठिकाणीही नोंदणी कार्यालये सुरू करण्याची मागणी नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, नितीन लढ्ढा, अशोक लाडवंजारी, इब्राहीम पटेल यांनी केली. मध्यवर्ती ठिकाण असल्याने पालिकेत आधार नोंदणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ते केंद्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयात किंवा अन्य मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय हलविणे सोयीचे ठरणार असल्याची बाब अधिकार्‍यांनी या वेळी निदर्शनास आणून दिली. त्यावर विचार होऊन शहरातील चारही प्रभागात केंद्र सुरु केल्यावर महापालिकेतील आधार नोंदणी इतरत्र हलविण्यात येणार आहे.