आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांनो ऐकल का? खड्डय़ांची खोली 5 इंचाची!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांचे बारा वाजले आहेत. नजर जाईल तेथे रस्त्यावर खड्डा दिसत असल्याने जळगाव शहर खड्डय़ात गेले असल्याचा प्रत्यय ‘दिव्य मराठी’च्या टीमने केलेल्या सर्वेक्षणातून येत आहे. शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनी, कोर्ट चौक ते टॉवर, टॉवर ते शिवाजीनगर उड्डाणपूल, टॉवर ते अंजिठा चौफुली, नेरी नाका ते स्वातंत्र्य चौक या चार किलोमीटरच्या परिसरात 120 लहान-मोठे खड्डे पडले आहेत. यातील 30 पेक्षा जास्त खड्डे साडेचार ते पाच इंचापर्यंत खोल आहेत. त्यामुळे वाहनधारकांना झिगझ्ॉग पद्धतीने रस्त्यावरून वापरावे लागत आहे. मात्र महापालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.


कोर्ट ते टॉवर 6 खड्डे
या मार्गावर कोर्ट ते नेहरू चौकापर्यंत एकही खड्डा नाही. नाथ प्लाझासमोर एक 5 इंचाचा मोठा जीवघेणा खड्डा आहे. याव्यतिरिक्त छोटे-मोठे 5 खड्डे असून कोर्ट चौक ते टॉवर चौक या मार्गावर एकूण 6 खड्डे आहेत.


काय म्हणतात तज्ज्ञ..
खड्डय़ांमुळे मान आणि कंबरदुखीचा त्रास वाढू शकतो. तसेच खड्डय़ांतून वाहन जोरात आदळल्यास ज्येष्ठ नागरिकांना मणक्यांचे फ्रॅर होण्याची भीती असते. इतर नागरिकांना ‘स्लिप डिस्क’ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. डॉ.रणजित चव्हाण, आर्थोपेडिकतज्ज्ञ


कमी जाडीच्या डांबर थरामुळे रस्त्यांना तत्काळ भेगा पडतात. तसेच त्यात पाणी शिरून खड्डे पडतात. त्यामुळे ट्रिमिक्स आणि खड्डय़ांमध्ये खडी, डांबर भरून रोलरने दाबून डागडुजी केली जाते. त्यासाठी सरफेस कोरडा असावा लागतो. तसेच पावसाळय़ात खड्डे बुजवण्यासाठी इमल्शन्स डांबर वापरावे लागते. के.पी.धांडे, अभियंता


वयोवृद्धांना असह्य वेदना
पावसाने रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहन चालवणे जिकिरीचे झाले असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वयोवृद्ध नागरिकांना या खराब रस्त्यांमुळे असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. सुनील पवार, शिक्षक


कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौक 18 खड्डे
कोर्ट कॅँटीनसमोरच 4 इंचाचा 1 मोठा खड्डा स्वागतासाठी सज्ज आहे. नूतन मराठा महाविद्यालयाचे गेट, रविकमल हॉस्पिटल, रजनीगंधा इमारत आदी परिसरात ठिकठिकाणी 3 इंचाचे खड्डे असल्याने नागमोडी वळण घेत वाहनधारकांना जावे लागते. ही जीवघेणी कसरत करून झाल्यानंतर ख्वाजामियॉँ चौकात रस्त्याच्या मधोमध 4 इंचाचे 8 मोठे खड्डे आहेत. गणेश कॉलनी चौकातही तिच परिस्थिती आहे. कोर्ट चौक ते गणेश कॉलनी मार्गावर 18 खड्डे आहे.


नेरीनाका ते स्वातंत्र्य चौक 12 खड्डे
वानखेडे सोसायटीजवळ 3.5 इंचाचा एक खड्डा आहे. आयबीपी पेट्रोल पंपासमोर, बेंडाळे चौकात 2.5 इंच, स्वातंत्र्य चौकापर्यंत 1 इंचाचे पाच असे एकूण या मार्गावर 12 खड्डे आहेत.