आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहाद्दर सैनिकांना जळगावकरांचा सलाम, पेढे वाटून जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाकिस्तानच्या घरात घुसून भारतीय कमांडोजनी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची बातमी दुपारी वृत्तवाहिन्यांवर झळकताच जळगाव शहरात आनंदाची लाट पसरली. पाकव्याप्त काश्मिरात रात्रभर चाललेल्या कारवाईचे वर्णन विविध चॅनल्सवर जसजसे प्रसारित होऊ लागले तशी नागरिकांमध्ये चैतन्याची लाट पसरली. सोशल मीडियावर पोस्ट, मेसेज एकापाठोपाठ फिरत गेले. बहाद्दर भारतीय सैनिकांच्या धडाकेबाज कारवाईमुळे जळगावकर नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून आला. मुजोर पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवल्याची भावना सर्वत्र होती. आनंदाने बेभान झालेले नागरिक रस्त्यावर उतरले. ढोल-ताशांचा जल्लोष, फटाक्यांची लड लाऊन जोरदार आतषबाजी सुरू झाली. पेढे-मिठाई वाटून आनंदाला वाट मोकळी करून देण्यात आली.

शहरात चैतन्याची लाट
उरीहल्ल्यात १८ भारतीय सैनिक धारातिर्थी पडल्यानंतर प्रत्येक देशवासीयांच्या मनात संतापाची लाट होती. मात्र, गुरुवारी भारतीय लष्कराने हल्लाबोल केल्याचे वृत्त पसरताच शहरवासीयांमध्ये चैतन्याची लाट पसरली. शहरातील टॉवर चौक, महापालिकेची, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस मुख्यालय आदी शासकीय कार्यालये, फुले मार्केट, दाणाबाजार, बीजे मार्केट, गोलाणी मार्केट आदी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाच्या मुखी केवळ लष्करी कारवाईचीच चर्चा होती. पाकिस्तानला कशी अद्दल घडवली, याची चर्चा करताना प्रत्येकाच्या डोळ्यात सैनिकांबद्दलचा अभिमान झळकत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखरपणाबद्दल कौतुक केले जात होते.

स्वराज्य निर्माण सेना संघटनेतर्फे जल्लाेष
स्वराज्य निर्माण सेना संघटनेतर्फे संध्याकाळी ७.३० वाजता शिवतीर्थ चाैकात फटाके फाेडून पेढे वाटून जल्लाेष करण्यात अाला. तसेच ‘भारत माता की जय’च्या घाेषणा देण्यात अाल्या. या वेळी संघटनेचे अध्यक्ष महेश सपकाळे, परेश सिनकर, विशाल जमदाडे, स्वप्निल शेटे, सागर माळी उपस्थित हाेते.

भाजप महानगरतर्फे अभिवादन आनंदोत्सव
भारतीयसैन्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भाजपतर्फे सायंकाळी वाजता वसंत स्मृती, भाजप कार्यालय येथे जळगाव जिल्हा भाजप महानगर कार्यालय आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजेंद्र फडके, आमदार हरिभाऊ जावळे, डॉ. अस्मिता पाटील, श्याम सातपुते, सुभाष शौचे, सरिता नेरकर, नितीन गायकवाड, मंडल अध्यक्ष राजेंद्र मराठे, कपिल पाटील, सुशील हासवाणी, धीरज सोनवणे, राहुल वाघ, दत्तू जाधव, संजय शिंदे, गणेश कोळी, अरुण भोई, संजय सोनवणे, संजय भोळे, अमित देशपांडे, बाळ निंबाळकर, नीलेश सोनवणे, कल्पेश कदम, आनंद सपकाळे, स्वप्निल भांडारकर, नीलेश झोपे, अमोल नेरकर, हेमंत शर्मा उपस्थित होते.

सोशल मीडियावर ‘जय हिंद’चे नारे
उरीहल्ल्यानंतर संतापाने लाल झालेला सोशल मीडिया गुरुवारी आनंदाने ओसंडून वाहात होता. नमस्कार करतानाचा मोदींचा फोटो आणि त्यावर ‘एकच फाइट, वातावरण टाइट’ असा चपखल संदेश असलेले असंख्य संदेश फिरत होते. पाकिस्तानी लष्कर, पंतप्रधान नवाज शरीफ यांची खिल्ली उडवणारे संदेश, ‘जय हिंद’चे नारे अशा मजकुरामुळे सोशल मीडियावर विजयाचा जल्लोष सुरू होता. विशेष म्हणजे इतरवेळी आपसात लढणारे, एकमेकांची उणीदुणी काढणारे राजकीय पक्षही गुरुवारी देशप्रेमाने जवळ आले. प्रत्येकाने भारतीय लष्कर आणि बहाद्दर सैनिकांचे एकमुखाने कौतुक करून त्यांना मानाचा मुजरा केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील कौतुक केले.

शनिपेठेत ढोल-ताशांच्या गजरात फोडले फटाके
भारत सरकारने उभारलेले सर्जिकल ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल बालाजीपेठ, शनिपेठे परिसरात नगरसेवक कैलास सोनवणे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडण्यात आले. तसेच उपस्थितांनी एकमेकास पेढे भरून आनंद व्यक्त केला. या वेळी विविध घाेषणा देण्यात अाल्या.
बातम्या आणखी आहेत...