आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावातील डॉक्टर कोर्टात जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याखाली (पीसीपीएनडीटी) राज्यातील 42 डॉक्टरांची तीन वर्षांसाठी व्यवसाय नोंदणी व परवाना निलंबित करण्यात आला आहे. या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय जळगावातील डॉक्टरांनी घेतला आहे.

नियमबाह्यरीत्या लिंगनिदान केल्याप्रकरणी जळगावातील डॉ. नीलेश लाठी, डॉ. राहुल कोल्हे, भुसावळातील डॉ. राजेश मानवतकर यांना तीन वर्षांसाठी प्रॅक्टिस बंद करण्याची कारवाई मेडिकल कौन्सिलने केली आहे. या कारवाईनंतर डॉ. लाठी यांनी ताबडतोब काम बंद केले आहे. मात्र, त्यांच्या पत्नी डॉ. गीतांजली लाठी यांच्या नावाने नर्सिंग होमची नोंदणी असल्याने त्या प्रॅक्टिस करू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे. ही कारवाई अन्यायकारक असून सकाळपासून 5 प्रसूतीच्या केसेस परत गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हेंचे भव्य हॉस्पिटल
नवीपेठेतील पद्मावती हॉस्पिटलचे डॉ. राहुल कोल्हे यांचाही कारवाईत समावेश आहे. सध्या त्यांच्या हॉस्पिटलला सील आहे. त्याठिकाणी दरवाजावर पोलिस ठाणे व दंडाधिका-यांनी बजावलेल्या नोटीस चिकटवल्या आहेत. तसेच पत्र व पत्रिकांचा ढीग साचला आहे. देवकाबाई कुंभार यांचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नवीपेठेतील हॉस्पिटल बंद असले तरी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी रिंगरोडला भव्य हॉस्पिटलची उभारणी केली आहे. परंतु या कारवाईने त्यांच्या भवितव्यासंदर्भात प्रश्न सतावतो आहे.

शिक्षण बारावीपर्यंतच
डॉ. लाठी, डॉ. कोल्हे व डॉ. मानवतकर हे एमडी आहेत. परंतु कारवाईमुळे त्यांना वैद्यकीय सेवा देता येणार नाही. तीन वर्षांत त्यांना अन्य कोणते कामही करायचे म्हटले तर त्यांचे शिक्षण केवळ बारावी सायन्सपर्यंतचे गृहीत धरले जाईल, असे आयएमएचे म्हणणे आहे.

कोर्टाचा अवमानच
धरणगाव न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे निलंबन केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे कौन्सिलला कळविले होते, तरीही कारवाई केल्याने मी खंडपीठात दाद मागणार आहे.
डॉ. नीलेश लाठी