आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: बंद झालेली 45 दारू दुकाने रहिवासी भागात स्थलांतराची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील मद्य विक्रीची दुकाने वाचवण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेकडे वर्गीकृत केलेले सहा राज्यमार्ग पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील ४५ मद्य विक्रीची दुकाने बंद झाली आहेत. आता ही दुकाने सुरू ठेवण्यासाठी रहिवासी वस्तीत स्थलांतराची शक्यता वाढल्याने नागरिकांसाठी ती आता डोकेदुखी ठरणार आहे. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रहिवाशांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन अर्ज देऊन दारू दुकानांना विरोध दर्शवला आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग, राज्यमार्गापासून ५०० मीटरपर्यंत असलेली मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातून जाणारे सहा राज्य मार्गांवरील ४५ मद्य विक्रीची दुकाने बंद होणार होती. तत्पूर्वीच राज्य शासनाने आदेश काढून हे सहा रस्ते महापालिकेकडे वर्ग केले होते. परंतु महापालिकेने जनमताचा विरोध पाहता महासभेत सहा रस्ते वर्ग करून घेण्यास विरोध दर्शवून राज्य शासनास याबाबत कळवले. त्यामुळे हे रस्ते पुन्हा बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. या निर्णयाने शहरातील लिकर लाॅबीला जबर झटका बसला अाहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ही दारू दुकाने बंद करावी लागणार असल्याने कायमस्वरूपी ताेडगा काढण्यासाठी लिकर लाॅबीकडून दुकाने नागरी वस्त्यांमध्ये स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये त्या भागातील नगरसेवक, वजनदार व्यक्तींच्या माध्यमातून दारूची दुकाने सुरू करण्याचे प्रयत्न हाेत अाहेत. दारूची दुकाने रहिवासी भागात अाल्यास नागरिकांना त्रास वाढून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिक अपापल्या भागाचा उल्लेख करीत येथे दुकाने स्थलांतरित करू नये, म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी करीत अाहेत. नागरी वस्त्यांमध्ये दारू दुकानांना विराेध करणारी निवेदने पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये येत आहेत. 
 
...या भागातील नागरिकांचे निवेदन 
भिकमचंदजैननगर, गुड्डुराजानगर, प्रेमनगर, कांचन काॅलनी, ढाकेनगर, भाेईटेनगर, मेहरूण या भागातील नागरिकांनी निवेदने दिली अाहेत. यात नगरसेवक संदेश भाेईटे, धर्मराज पाटील, संजीवनी पाटील, धनश्री चाैधरी, हर्षल पाटील, कल्पना चाैधरी, वर्षा अत्तरदे, दिनकर पाटील, मिलिंद पाटील, काजल देशमुख, स्वप्निल पिंपरकर, भगवान मिस्तरी याचा समावेश अाहे. दारू विक्रेते या भागात दुकानासाठी जागा शाेधत असून त्यांना या भागात दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...