आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न नसल्याने जळगाव विमानतळ देणार भाड्याने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विमानसेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेले जळगाव विमानतळ भाडेतत्त्वावर ट्रेनिंगसाठी मिळावे म्हणून गोंदियाच्या सीएई अकॅडमी व एनएफटीआय (नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) यांनी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीला प्रस्ताव दिला आहे. धावपट्टी व साइटची पाहणी केल्यानंतर त्यांनी सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या जळगाव विमानतळासाठी प्रयत्न चालविले आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या पावसाळ्यात जळगावात ट्रेनिंग सेंटर सुरू होईल. उत्पन्नच नसल्याने प्राधिकरणही विमानतळ भाड्याने देण्याच्या तयारीत आहे.

बारामतीच्या ट्रेनिंग सेंटरची विमाने अधूनमधून जळगाव विमानतळावर घिरट्या मारताना दिसतात. हँगर सोडल्यास इतर वर्ल्डक्लास दर्जाच्या सुविधा असल्याने या विमानतळाकडे गोंदियाच्या फ्लाइंग क्लबचे लक्ष गेले आहे. पावसाळ्यात चार महिने होणारा त्रास टाळण्यासाठी जळगावचे विमानतळ भाडेतत्त्वावर मिळावे असा त्यांचा प्रस्ताव आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाशी हे ट्रेनिंग सेंटर संलग्नित असल्याने त्यांच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे फ्लाइंग क्लब- गोंदिया येथे 2008 मध्ये सीएई ऑक्सफोर्ड अव्हेंशन अकॅडमी हे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले. एनएफटीआय या संस्थेसोबत सुरू झालेल्या या अकॅडमीत प्रशिक्षणार्थींना पायलट, इंडिगो कॅडेट पायलट या प्रकारचे शिक्षण देण्यात येते. फ्लाइंग क्लब या नावाने ही संस्था प्रचलित आहे.

वातावरण चांगले- फ्लाइंग क्लबचे मॅनेजर कॅप्टन अर्जुन दास यांच्या टीमने नुकतीच जळगावात येऊन विमानतळाची पाहणी केली. अ‍ॅप्रन, टॅक्सी वे, वेटिंग रूम आणि वातावरणाच्या दृष्टीने जळगाव विमानतळ चांगले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.