आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव काँग्रेसची जम्बो जिल्हा कार्यकारिणी; 131 जणांचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीवरून काँग्रेस अंतर्गत उफाळलेल्या गटबाजीवर रामबाण उपाय म्हणून सर्वांना खुश करण्यासाठी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी तब्बल 131 जणांचा समावेश असलेल्या नव्या जंबो कार्यकारिणीस मान्यता दिली.

मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकारिणीतील 64 जणांचा समावेश असलेल्या यादीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी 28 सप्टेंबर 2012 च्या पत्रान्वये मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर या यादीवर नाराजी व्यक्त करण्यात येऊन नवीन नावांचा समावेश करण्याची मागणी काँग्रेसमधील गटांनी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन नवीन नावांचा समावेश करून सुधारित यादीस मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी पूर्वी 64 जणांच्या नावासकट 131 नावांना मान्यता दिली आहे. जिल्हाध्यक्षांच्या यादीवर मोठा गदारोळ झाला होता. रावरे, यावल, जामनेर, धरणगाव, अमळनेर या तालुक्यांतून मोठा विरोधही झाला. आमदार शिरीष चौधरी यांचे नेतृत्त्व मानणार्‍यांनी यावल, फैजपूर, रावेर येथे बैठका घेऊन जिल्हाध्यक्षांच्या यादीवर आक्षेप घेत पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. पक्षांतर्गत इतर विरोधी गटांचा रोष लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्षांनी सर्व गटांना खुश करण्यासाठी 56 नवीन नावांचा यादीत समावेश करून गटबाजीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. तथापि खरंच पक्षांतर्गत गट जंबो यादीमुळे सुखावले किंवा नाही हे कळू शकलेले नाही.


पक्षाच्या विरोधात काम कराल तर कारवाई
काँग्रेसच्या 50 जणांच्या बैठकीत 69 जागा लढविण्याची घोषणा
काँग्रेस कमजोर हे विसरा. प्रत्येकाने नगरसेवक, महापौर, उपमहापौरांच्या भूमिकेतून कामाला लागा आणि सतरा मजलीवर काँग्रेसचा झेंडा फडकवा. नेत्यांकडे तक्रारीचे रडगाणे गात बसू नका. ही संधी गमावली तर काँग्रेसला चांगले दिवस येण्याची शक्यता नाही. त्यामुळे आताच कामाला लागण्याचे आवाहन करीत महानगराध्यक्ष अँड.सलीम पटेल यांनी स्वबळावर सर्व 69 जागा लढविण्याची घोषणा करीत निवडणुकीचे रगशिंग फुंकले. विशेष म्हणजे त्यांच्या बैठकीला 3 महिलांसह केवळ 50 जण उपस्थित होते. गटबाजीच्या नादात विरोधात गेले तर खबरदार, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील इतर पदाधिकार्‍यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरविली.

काँग्रेस भवनात पालिका निवडणुकीसंदर्भात बुधवारी बैठक घेण्यात आली. अँड. पटेल म्हणाले, महापालिका निवडणुकीत माझे नातेवाइक आणि घरातील एकाही व्यक्तीला उमेदवारी देणार नाही. सतरंजी उचलणार्‍या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देऊ; पक्ष ताकद देण्यासाठी तयार आहे. मात्र, आम्हीच कमी पडतो. महापालिका निवडणुकीसाठी मंत्र्यांचे दौरे आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कठीण असले तरी सर्व जागा लढविण्याचा पुनरुच्चार करीत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या विरोधात काम करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे वचन वरिष्ठांकडून मिळाले आहे. त्यामुळे जो सोबत येईल तोच आमचा असेल. काँग्रेसच्या विरोधात जाणार्‍यांवर नजर ठेवली जाईल. महापालिका, लोकसभा आणि विधानसभा या तीन महत्त्वाच्या परीक्षा पास होणे आवश्यक आहे. असे झाले नाही, तर जिल्ह्यात आपल्याला कुणी विचारणार नसल्याची वस्तुस्थिती अँड. पटेल यांनी मांडली. डॉ. अर्जुन भंगाळे, पंचायत राजचे जिल्हाध्यक्ष विवेक ठाकरे यांनीदेखील सहकार्याचे आश्वासन दिले.