आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यात अकरावीसाठी 6,440 जागा उपलब्ध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहावीच्या निकालानंतर अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, यंदा शहरातील 14 महाविद्यालयांत अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी एकूण 6,440 जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना 15 जून रोजी गुणपत्रके मिळणार असली तरी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेला निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. शहरातील 61 शाळांमधून 5,662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने उपलब्ध जागा पाहता सर्वांना प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. शहरातील दोन-तीन प्रतिष्ठित महाविद्यालये वगळता इतर ठिकाणी प्रवेशासाठी फारशा अडचणी येत नाहीत. यंदा दहावीचा निकाल चांगला लागल्याने प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असेल. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिक्षण घेऊ इच्छिणारा एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी शिक्षण विभागाने घेतली आहे. विशिष्ट महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्याचा अट्टाहास वगळता इतर महाविद्यालयांत सहज प्रवेश मिळेल, अशी सध्याची स्थिती आहे.

शहरात 5,662 विद्यार्थी उत्तीर्ण
यंदा दहावीच्या परीक्षेत शहरातील 61 शाळांमधून 5,395 नियमित व 267 पुनर्परीक्षार्थी असे एकूण 5,662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या तुलनेत शहरातील 14 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा मिळून 6440 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. केवळ विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार्‍यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळतील. अशा वेळी कमी गुणांमुळे आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शाश्वती नाही.

जिल्ह्यातील जागा रिक्त
शहरात जरी गुणवत्ता यादीची डोकेदुखी असली तरी जिल्ह्यात मात्र गुणवत्ता यादी असतानाही विद्यार्थ्यांना विनासायास प्रवेश मिळतील. शिक्षण तज्ज्ञांच्या मते, जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत क्षमतेपेक्षाही कमी विद्यार्थी प्रवेश घेतात. अनेक वेळा या महाविद्यालयांमध्ये वर्षभर जागा शिल्लक राहतात. कमीत कमी 60 विद्यार्थी असल्यास शिक्षण विभागाकडून विभक्त तुकडीसाठी मान्यता देण्यात येते. मात्र, काही ठिकाणी जागा रिक्त राहण्याचे प्रमाण जास्त आहे.

जळगाव शहरात उपलब्ध असलेल्या जागा

महाविद्यालय विज्ञान कला वाणिज्य
मू.जे. महाविद्यालय 1000 120 360
नूतन मराठा महाविद्यालय 480 960 480
बाहेती महाविद्यालय 120+120 120 120
बेंडाळे महिला महाविद्यालय 240 240 360
अँग्लो उर्दू 240 80 --
इकरा उर्दू 160 -- --
धनाजीनाना चौधरी 120 -- --
नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालय 80 160 80
का. उ. कोल्हे कनिष्ठ महाविद्यालय 80 80 --
सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालय80 80 --
सेंट टेरेसा कनिष्ठ महाविद्यालय 80 -- 80
जि.प. विद्यानिकेतन -- 80 --
के. के. उर्दू कनिष्ठ महाविद्यालय -- 80 --
महाराणा प्रताप कनिष्ठ महाविद्यालय -- 160 --

35 टक्क्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
दहावीचा निकाल जाहीर झाला त्या दिवशी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी 35 टक्केमिळविणार्‍या विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेत प्रवेश मिळेल, अशी घोषणा केली होती. प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, अद्याप त्या संदर्भातील परिपत्रक नाशिक विभागीय मंडळाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे 35 टक्के मिळविणार्‍या विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेत प्रवेश मिळेल किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रवेशप्रक्रियेबाबत आज बैठक
माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेशप्रक्रियेसंदर्भात जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील मुख्याध्यापकांची मंगळवारी बैठक होणार आहे. मू. जे. महाविद्यालयाच्या विवेकानंद भवनात सकाळी 11 वाजता ही बैठक होईल. नाशिक विभागाचे सहायक शिक्षण संचालक राजेंद्रप्रसाद मारवाडी, शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, सहायक शिक्षण उपनिरीक्षक पी. बी. चौधरी मार्गदर्शन करतील.

अशी आहे प्रवेशप्रक्रिया
12 जूनपर्यंत : विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, तेथे जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.
13 ते 15 जून : प्राप्त अर्जांची छाननी, संवर्गनिहाय सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करणे.
15 जून : सायंकाळी 4 वाजेपर्यंत गुणवत्ता व प्रतीक्षा यादी तयार करून ती महाविद्यालयात ं0 16 ते 19 जून : गुणवत्ता यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
20 जून : रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
21 ते 24 : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही रिक्त राहिलेल्या जागा प्राप्त अर्जांनुसार गुणानुक्रमे भरणे.
25 जून : शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रवेशसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची यादी, संवर्गनिहाय गुणवत्ता यादी व प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांंची संवर्गनिहाय यादी सादर करणे.
12 जुलैपर्यंत : प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देणे.