आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीपीडीसी’साठी भुसावळात सर्वपक्षीय नगरसेवकांची एकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- एरव्ही चार दिशेला चार तोंडे अनुभवणार्‍या भुसावळ पालिकेच्या सभागृहाला शुक्रवारी सुखद धक्का बसला. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक झाली. एकमेकांना कोपरखळ्या मारून तर कधी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बैठकीचा समारोप मात्र सर्वपक्षीय पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या आवाहनाने झाला.

‘डीपीडीसी’साठी लहान नागरी मतदार संघातून पाच सदस्यांना संधी मिळेल. मात्र, आठ पैकी तिघांनी माघार न घेतल्याने शनिवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर सर्वपक्षीय पॅनलचे गठण झाले आहे. माधुरी फेगडे (यावल), सुमनबाई अनुष्ठान (पारोळा), अजय भोळे, उमेश नेमाडे, संगीता बियाणी (भुसावळ) हे सर्वपक्षीय पॅनलचे उमेदवार आहेत.

यानुषंगाने पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक झाली. राष्ट्रवादीचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष मनोज चौधरी यांनी सर्वपक्षीय पॅनलच्या पाच सदस्यांना पहिली पसंती द्यावी, असे आवाहन केले. नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अजय भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक युवराज लोणारी यांनी गटबाजीला बळी पडू नका, असे सांगितले. यावलच्या नगराध्यक्षा माधुरी फेगडे, पारोळा येथील सुमनबाई अनुष्ठान, उमेश नेमाडे, संगीता बियाणी आणि अजय भोळे यांच्यासह भुसावळ शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. एकमेकांना चिमटे काढण्याची संधी साधत नगरसेवकांनी सभागृहात हास्याचे फवारे उडवले. काहींनी तर चक्क मोठय़ा हॉटेलात शाही भोजनाची इच्छा व्यक्त केली. एकूणच शहराच्या विकासासाठी कधीही एकत्र न येणार्‍यांनी स्वत:च्या उमेदवारीसाठी मात्र गळाभेट घेतल्याने शहरवासी अवाक् झाले.