आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgoan District Rawer Congress Leader Amol Patil Party Change

रावेरमध्ये काँग्रेसला दे धक्का, अमोल पाटील भाजपच्या वाटेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रावेरमध्ये काँग्रेसला मोठेच खिंडार पडणे निश्चित झाले आहे. तालुक्यातील एक मोठा गट काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून भाजपच्या वाटेवर आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेश सरचिटणीस आमदार गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जम्बो कार्यक्रमातून काँग्रेसला हादरा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा खांद्यावर मिरवणारे केर्‍हाळा येथील शेतकरी शशिकांत पाटील यांचे चिरंजीव तथा रावेर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह 50 गावातील त्यांचे सर्मथक लवकरच भाजपमध्ये जाणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत केर्‍हाळा-पाल गटातील उमेदवार म्हणून तयारीला लागलेल्या अमोल पाटील यांचे तिकीट ऐनवेळी कापून काँग्रेसमधील एका गटाने जबरदस्त खेळी केली होती. पाटील यांच्या परिवाराने पक्षासाठी योगदान दिलेले असताना सुद्धा त्यांना झुलवत ठेवण्यात आले. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीतही संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झाली. शिवाय काँग्रेसच्या काही मंडळींनी तयारीला लागण्याच्या सूचना केल्याने बॅनर्स, होर्डिंग तयार केले होते. पण, गटबाजीमुळे पुन्हा माशी शिंकल्याने पाटील यांच्यासह मित्रपरिवार नाराज झाला होता. ही नाराजी ओळखून भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी त्यांना पक्ष प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. यानुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश निश्चित केला आहे.

तालुक्यातील 50 गावातील सर्मथकांसह ते लवकरच काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेते खडसे, प्रदेश सरचिटणीस आमदार गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. याबाबत रावेर पंचायत समितीचे सदस्य नंदकिशोर महाजन यांच्याकडे विचारणा केली असता, अमोल पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबाबत दुजोरा मिळाला. भाजपच्या या खेळीने काँग्रेसला तालुक्यात मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.