आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgoan Electricity Company Que Management System

‘क्यू मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित, वीज बिलासह चुकीच्या रीडिंगबाबत करता येणार तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वीजबिलांमधील घोटाळे, चुकीचे रीडिंगसह अवास्तव बिलांच्या तक्रारींचा क्रॉम्प्टन कार्यालयावर पडणारा पाऊस रोखण्यासाठी वीजवितरण क्रॉम्प्टन कंपनीने आता ‘क्यू मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. यात तक्रारी घेऊन आलेल्या ग्राहकाने मशिनवर आपली तक्रार नोंदवल्यास त्याला टोकन नंबर दिला जाणार आहे. त्यानंतर त्याची तक्रार त्वरित दूर करण्यात येणार आहे. कंपनीच्या दीक्षितवाडीतील ग्राहक सुविधा केंद्रात ही यंत्रणा सुरू आहे.

पारदर्शी अंमलबजावणी व्हावी
कॉर्पोरेट कल्चरच्या निर्मितीनंतरही वीजबिलांच्या तक्रारींचा ससेमिरा सुटता सुटत नसल्याने कंपनीने एक पाऊल पुढे टाकत आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘क्यु मॅनेजमेंट सिस्टीम’द्वारे दिवसभरात आलेल्या तक्रारी विभक्त करून त्या र्मयादित वेळेत सोडविल्या जाणार आहेत. मशीनमध्ये तक्रारदाराचा नंबर, वेळ व संबंधित विभागाची नोंद पावती ग्राहकाला मिळेल.

अशी असेल क्यूएमएस प्रणाली
एटीएम मशीनप्रमाणे या मशीनचे कार्य असेल. इकोव्हिजन नामक मशीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांपैकी एका भाषेची निवड ग्राहक करेल. यानंतर मशीनमध्ये दिलेल्या तक्रारींपैकी आपल्या तक्रारीवर क्लिक करावे लागेल. यानंतर प्रिंटचे बटण दाबून ग्राहकास मशीनद्वारे टोकन नंबर मिळेल. हा नंबर संबंधित विभागातील कर्मचार्‍यांकडे वर्ग होईल. काही मिनिटात कर्मचार्‍यांकडील संगणकावर नंबर येताच तो नंबर मशीनवरील स्पीकरद्वारे जाहीर होईल. यानंतर ग्राहकाला संबंधित नंबरच्या काउंटरवर जाऊन तक्रार मांडावी लागणार आहे. यामुळे ग्राहकांची होणारी मोठी गैरसोय दूर होईल.

प्रत्येक तक्रारीची दखल घेणार
बिलांसह नवीन कनेक्शन व संबंधित तक्रारी या माध्यमातून सोडल्या जातील. यासह सर्वाधिक तक्रारी कोणत्या याचे विश्लेषणही कंपनीस करता येईल. ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला व कंपनीचा वेळ वाचवावा. तक्रारींची दखल घेतली जाईल. डॉ.व्ही.पी.सोनवणे, युनिट हेड, क्रॉम्प्टन ग्रीव्हज

असा होईल ग्राहकाचा फायदा
या प्रणालीद्वारे तक्रार नोंदविण्यास आलेल्या ग्राहकास तक्रार कोणाकडे द्यावी याविषयी माहिती नसल्याने व्यर्थ जाणारा वेळ यामुळे वाचणार आहे. यासह पुन्हा येताना या तक्रारीवर काय कार्यवाही झाली, आपली तक्रार कोणत्या स्टेपला आहे. याविषयी माहिती मिळू शकणार आहे. यासह एकाच वेळी होणारी गर्दी व मानसिक ताण यामुळे कमी होणार आहे.

ग्राहक या तक्रारी मांडू शकतात
0 वीजबिले वेळेवर मिळत नाहीत.
0 वीजमापकावर चुकीचे रीडिंग घेतले जाते.
0 अवास्तव रकमेचे वीजबिल मिळत आहे.
0 मीटर जोरात चालते, ते तपासून मिळावे.
0 वापर नसतानाही सरासरी बिल दिले जाते.
0 डोअरलॉकमुळे माझे रीडिंग घेतले जात नाही.
0 मला नवीन वीज कनेक्शन हवे आहे.