आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणसंग्राम : प्रभागरचना जाहीर होण्यावरच इच्छुकांची गणिते अवलंबून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोणी राजकीय भवितव्याच्या दृष्टीने, तर कोणी नशीब आजमावण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण यंदाच्या निवडणुकीत अनेक भागांची जोडतोड होणार असल्याने अनेकांच्या उमेदवारीचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभागरचनेनंतरच निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय इच्छुक घेणार आहेत.

ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी जुलै महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटायला सुरुवात केली आहे.

यंदा प्रभागसंख्या कमी होऊन नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून संधी मिळेल, या विचारातून इच्छुकांनी जनसंपर्कावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याची तयारी करणारे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक संस्थांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. तसेच निवडणुकीपूर्वी जनसंपर्कासाठी खर्चाची गरज नसल्याने प्रभागरचनेपूर्वीच मतदारांचे मत जाणून घेण्याची शक्कल लढवली जात आहे.

प्रभागरचनेनंतर होणार चित्र स्पष्ट

पालिका निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रभागरचनेची कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात पूर्वीच्या वॉर्डरचनेतून कोणता भाग तोडला गेला अथवा जोडला गेला आहे, तसेच जातीय समीकरणांसह आर्थिक बाबींचा विचार करता निवडणुकीसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे की नाही, याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतरच उमेदवारी जाहीर करण्याचा फैसला घेतला जाणार असल्याचे इच्छुकांकडून सांगितले जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांची घेतली जातेय मदत

निवडणूक म्हटल्यावर तरुणांचा उत्साह प्रचंड असतो; परंतु यंदा विद्यमान नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा उपयोग करून घेतला जात आहे. निवृत्त कर्मचार्‍यांच्या सायंकाळच्या कट्टय़ावर हजेरी लावून परिस्थिती काय असू शकते, याबाबतचा फीडबॅक घेतला जात आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून खरे काय ते चित्र स्पष्ट होत असते, असा मतप्रवाह आहे.

अनेकांना मिळणार संधी

यंदा खान्देश विकास आघाडी, शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष व आरपीआयच्या गटांतर्फे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच नगरसेवकांची संख्या 76पर्यंत जाण्याची शक्यता असून, त्यात महिलांसाठी 50 टक्के जागा राहणार आहेत. त्यामुळे जुन्यांसोबत नवख्यांनाही संधी मिळणार आहे. महिला उमेदवारांच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी वॉर्डातील प्रतिष्ठित कुटुंबांतील महिलांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने कुटुंबप्रमुखाचे मन वळवण्याचे काम सुरू असून, ‘तुम्ही केवळ अर्ज भरा; बाकीचे आम्ही पाहून घेऊ’ अशी तयारी दाखवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.