आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपनेही दिले लेवा नेतृत्व; खडसेंच्या बंगल्यावरच निश्चित झाले नाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय जनता पक्षानेसुद्धा लेवा समाजाला प्राधान्य देत महानगराध्यक्षपदाची माळ सुरेश भोळेंच्या गळ्यात घातली. यामुळे आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांचे शहरात नेतृत्व करणारे चेहरे लेवा समाजातील राहतील. त्यामुळे सर्वात मोठा मतदार असलेल्या या समाजाला आकर्षित करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहील.

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीचा बुधवारी शेवटचा दिवस होता. भाजपच्या दृष्टीने ‘हेडक्वार्टर’ असलेल्या जळगाव महानगर अध्यक्षाच्या निवडीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून होते. पुढील तीन वर्षांकरिता होणार्‍या निवडीसाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजता ब्राह्मणसभेत बैठक झाली. सदाशिव पाटील निवडणूक निर्णय अधिकारी होते. या वेळी प्रदेश चिटणीस सुनील बढे, जिल्हा सरचिटणीस उदय वाघ, स्मिता वाघ, डॉ. सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बिनविरोध निवडीसाठी एकमताने निर्णय घेण्याचे आवाहन केले.

सहा जणांचे अर्ज
भाजपमध्ये प्रतिष्ठेचे मानल्या जाणार्‍या महानगराध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून काही दिवसांपासून फिल्डिंग लावण्यात येत होती. त्या दृष्टीने पक्षर्शेष्ठींकडेही पाठपुरावा केला जात होता; परंतु आगामी काळातील पक्षासमोरील आव्हाने पेलण्यासाठी ताकद पणाला लावावी लागेल, असा संदेशच नेत्यांनी दिल्यानंतर अनेकांनी त्यातून माघार घ्यायला सुरुवात केली; परंतु तरीदेखील ऐनवेळेस अध्यक्षपदासाठी सहा अर्ज दाखल झाले. त्यात सुरेश भोळे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, सुनील पाटील, अनंत जोशी, किशोर वाघ यांचा समावेश होता.

ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवड
जळगावचा अध्यक्ष कोण, याबाबत मंगळवारीच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यात इच्छुकांनी आपली मते मांडली. त्यात लाडवंजारी यांना जिल्हा पातळीवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने त्यांनी माघार घेण्याची मानसिकता केली. अन्य इच्छुकांनाही परिस्थितीची कल्पना देत आश्वासन देण्यात आल्याने कोअर कमिटीने ठरवल्याप्रमाणे सुरेश भोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक ठरली.

राजकीय समीकरणातून मिळाली संधी
नवनियुक्त महानगराध्यक्ष सुरेश भोळे भाजपचे महापालिकेतील गटनेते असून त्यांच्याकडे यापूर्वीही महानगराची जबाबदारी होती. पूर्वानुभव लक्षात घेता त्यांचे नाव अगोदरपासूनच चर्चेत होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच महानगराध्यक्षपदी लेवा समाजाला प्राधान्य देत मनोज दयाराम चौधरी यांची नियुक्ती केली. महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडेही विष्णू भंगाळे याच्या रूपाने चेहरा आहेच. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्वही ललित कोल्हेंकडे आहे. त्यामुळे निवडणुकीत शहरातील लेवा समाजाचे मतदान ओढण्यासाठी भाजपनेही लेवा समाजालाच प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवक भोळेंची जबाबदारी वाढली
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराची धुरा सांभाळलेल्या भोळेंवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यात शहरातील पक्षाची ताकद वाढवताना कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे कौशल्य भोळेंना दाखवावे लागणार आहे, तसेच भाजपमध्ये सुरू झालेले गटातटाचे राजकारणालाही तोंड द्यावे लागणार आहे.