आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgoan Municipal Corporation Election: No Party During The Election Period

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महानगरपालिका निवडणूक: पाटर्य़ा देणेही आचारसंहितेचा भंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी याचा दुसरा टप्पा मंगळवारपासून लागू होणार आहे. उमेदवारांना त्या दिवसापासून खर्चाचा हिशेब सादर करावा लागणार आहे. निवडणूक काळात कोणताही उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी मतदारांना मद्य वाटप करत असल्याचे निदर्शनास आल्यास आचारसंहितेचा भंग झाल्याची नोंद होणार आहे.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारास मतमोजणीपर्यंत झालेल्या सर्व खर्चाचा हिशेब सादर करावा लागणार आहे. संबंधित उमेदवारास शासकीय, निमशासकीय संस्थांच्या इमारतींचा अथवा आवाराचा निवडणुकीच्या मोहिमेसाठी, मुलाखतींसाठी, बैठकीसाठी वापर करता येणार नाही. महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास असे प्रकार आढळून आल्यास तत्काळ ते थांबवले जाऊ शकतात. आचारसंहिता कालावधीत दौर्‍यावर असलेल्या मंत्रीमहोदयांना डी.व्ही.कार देता येणार नाही. निवडणूक प्रचारकामात शासकीय वाहनांचा वापर होणार नाही, याची दक्षता प्रशासनास घ्यावी लागते.

दौर्‍याची उधळपट्टी पक्षांच्या खर्चात
प्रचार कामाकरिता येणार्‍या नेत्यांना केंद्र किंवा राज्य शासनाची किंवा अन्य उपक्रमांची विमाने, हेलिकॉप्टर्स वापरता येत नाही. प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी किंवा पदाधिकारी यांनी खासगी विमाने किंवा हेलिकॉप्टर्स वापर केल्यास त्याचा खर्च पक्षाच्या खर्चात मोजला जाईल. स्टार प्रचारकांना हा निकष लागू होणार नाही.


केंद्राबाहेरील रांगांचे छायाचित्रण करता येणार नाही
शहरातील संवेदनशील भागातील छायाचित्रण प्रशासनाला करता येईल. मतदारांना उघडपणे लाच देतानाचे चित्रीकरण करता येईल. मात्र मतदान केंद्राबाहेर सुव्यवस्थित रांगा लावल्या असल्यास त्याचे चित्रण प्रशासनास करता येणार नाही. दारोदार करण्यात येणारा प्रचार, प्रचारासाठी लाउडस्पीकर्स लावलेली फिरती वाहने यांचे छायाचित्रण करता येणार नाही. चित्रीकरणात काही गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई अटळ आहे.

ध्वजवंदनात आचारसंहितेचा अडसर नाही
प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्यास आचारसंहितेची अडचण येत नाही. महापालिकांमध्ये महापौर, पंचायत समितीत सभापती यांना ध्वजवंदन करता येते. मात्र, हे कार्यक्रम करताना नेहमीच्या स्थळात बदल करता येत नाही. या ठिकाणी निवडणूक प्रचाराविषयी भाषण करता येणार नाही.


शुक्रवारी सायंकाळी होणार प्रचार बंद
निवडणूक लढणार्‍या उमेदवारास प्रचाराची संधी दिली जाते. मतदानाच्या 48 तास अगोदर प्रचार बंद करावा लागतो. जळगाव पालिका निवडणुकीसाठी 1 सप्टेंबर रोजी मतदान होणार असल्याने 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रचार बंद करावा लागणार आहे. प्रचारासाठी प्रार्थनास्थळांचा वापर करता येणार नाही.

शस्त्रास्त्र बंदीचे पालन होणे गरजेचे
निवडणूक जाहीर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ही बंदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहते, या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अथवा संबंधित पोलिस अधिकार्‍यांकडून काढले जातात. या संदर्भातील दक्षता जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांना घ्यावी लागते.


मद्य वाटप आचारसंहितेच्या कक्षात
निवडणूक काळात मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी ओल्या पाटर्य़ांचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. बहुतांश कार्यकर्त्यांचे लक्ष पाटर्य़ांकडे लागून आहे. शहरात आचारसंहिता लागू असताना उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी निवडणूक काळात मद्य वाटप करत असल्याचे निदर्शनास आल्यास आचारसंहितेचा भंग होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी दारूबंदी राहणार आहे. असे प्रकार करताना कोणी आढळल्यास कारवाई होईल.