आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgoan Politics News In Marathi, Eknath Khadse, Haribhau Jawale, Divya Marathi

जळगावमधील नवी राजकीय समीकरणे गती, रिंगणाबाहेरच्या मराठा नेत्यांवर मदार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार हरिभाऊ जावळेंचा पत्ता कट करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची मांडणी केली जात आहे. मतदार संघात सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या मराठा समाजाचा उमेदवार या वेळी प्रस्थापित राजकीय पक्षांनी रिंगणात उतरवलेला नाही. म्हणूनच या समाजाच्या लोकनेत्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मतदारसंघात एकूण 15 लाख 38 हजार 352 मतदार आहेत. त्यात एकट्या मराठा समाजाचे 3 लाख 43 हजार 201 मतदार आहेत. त्या खालोखाल मुस्लिम समाजाची 2 लाख 32 हजार 605, लेवा पाटीदार समाजाची 1 लाख 95 हजार, बुद्धिस्ट समाजाची 1 लाख 95 हजार 34 मते आहेत. या चार समाजाच्या मतांची विभागणी करण्यात कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला यश मिळते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. गत निवडणुकीत राष्टÑवादीने मराठा समाजाचे नेते अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना तर भाजपने लेवा पाटील समाजाचे खासदार हरिभाऊ जावळे यांना दुस-यांदा उमेदवारी दिली होती. बसपातर्फे सुरेश चिंधू पाटील यांनी उमेदवारी केल्यामुळे मराठा मतांची विभागणी झाली म्हणून अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचा पराभव झाला होता, असा निष्कर्ष त्या वेळी काढण्यात आला होता. आता मात्र, या समाजाचा उमेदवारच रिंगणात नसल्याने रिंगणाबाहेरच्या मराठा नेत्यांचे महत्त्व वाढले आहे.


कैलास पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
भाजप उमेदवाराला गेल्या दोन दशकांपासून 10 ते 12 हजारांचे मताधिक्य देणा-या चोपडा तालुक्याचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. गत काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या तालुक्यात शिवसेना व भाजपात मत अन् मनभेदाची दरी विस्तारली आहे. परिणामी शिवसेना नेत्यांना भाजपपेक्षा कॉँग्रेस जवळचा विश्वासू मित्र वाटू लागला आहे. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील हे किमान चोपडा तालुक्यात तरी ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जातात. मात्र, मध्यंतरी भाजपने त्यांना पाहिजे तसे सहकार्य केले नसल्याचे शल्य त्यांना सातत्याने बोचत आहे. याबाबत त्यांनी सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर वाच्यता केली नसली तरी वर्ष-दीडवर्षभरापूर्वी ‘भाजपला योग्य वेळी धडा शिकवावाच लागेल’, असे विधान चोपड्यात केले होते, हे विसरून चालणार नाही. त्यांच्या या विधानाची आठवण विरोधकांकडूनही पद्धतशीरपणे करून दिली जात आहे. त्यामुळे नागेश्वर भक्त असलेले कैलास पाटील हे ‘हर हर मोदी’ चा जयघोष करतात की, भाजपला धडा शिकवण्याची छुपी रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, किशोर काळकर हे सोमवारी चोपड्यातील शिवसेना पदाधिका-यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. मात्र, माजी आमदार कैलास पाटील हे आठवड्यातील दर सोमवारी शिरपूर तालुक्यातील नागेश्वर मंदिरावर शिवआराधनेसाठी जातात, हे माहित असतानाही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना याच दिवशी तालुक्यात बोलावण्याचे प्रयोजन काय? कैलास पाटील व खडसेंची पुन्हा गळाभेट होऊ नये, असे तर स्थानिक भाजपेयींना वाटत नसावे ना? असा प्रश्नही दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे.


खडसेविरोधक सक्रिय
एकनाथ खडसे यांनी गतकाळात रावेरात माजी आमदार अरुण पाटील, अमळनेरात डॉ. बी. एस. पाटील यांचे आमदारकीचे तिकीट कापले होते. त्यामुळे हे दोन्ही माजी आमदार आजमितीला अनुक्रमे राष्ट्रवादी व कॉँग्रेस या पक्षात आहेत. हे दोघे जण मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या शब्दाला रावेर मतदार संघात मानणारा वर्ग तयार झाला आहे. जोपर्यंत भाजपचे उमेदवार म्हणून हरिभाऊ जावळेंचे नाव पुढे होते, तोपर्यंत काही अंशी शांतता होती. आता मात्र, रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाल्याने या दोन्ही माजी आमदारांचे समर्थक आणि विविध राजकीय पक्षातील खडसे विरोधक ताकदीने सक्रिय झाले असल्याचे चित्र वेगवेगळ्या अंतर्गत बैठकांवरून प्रकर्षाने समोर येत आहे.


भाजपमध्ये अस्वस्थता वाढली
विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार कैलास पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांच्यासोबत होते. त्यामुळे मनीष जैन यांना त्यांनी पूर्णपणे सहकार्य केले होते. आताही ते जैनांचा शब्द प्रमाण मानतात की, भाजपचे कमळ फुलवण्यासाठी पायाला भिंगरी लावून मैदानात उतरतात, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवमंदिरावरून जोपर्यंत सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत ‘दुरून डोंगर साजरे’ अशी भूमिका घेतली आहे. म्हणूनच भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.