आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात कोरड्या रंगांनी धुळवड साजरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रासायनिक रंगांऐवजी अबीर-गुलालासह ‘इको फ्रेंडली’चे सप्तरंग वापरत व पाण्याचा वापर टाळत रंगपंचमीचा आनंद जळगावकरांनी लुटला. गल्लीबोळासह चौकाचौकात कोरड्या रंगांची उधळण करत ‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनाला साद देत नागरिकांनी ‘टिळा होळी’ला उत्स्फूर्ते प्रतिसाद दिला. रंगपंचमीनिमित्त अनेक शाळा, सामाजिक मंडळे व राजकीय पक्षांतर्फे भजन, व्याख्याने, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनासह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

पाणीटंचाईच्या स्थितीमुळे तीन दिवसाआड करावा लागणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’सह शासकीय यंत्रणेने केले होते. त्यास शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना व महिला मंडळांनी पाठिंबा दिला होता. या सामाजिक भावनेची जाणीव ठेवत नागरिकांनी पाण्याचा वापर टाळून कोरड्या रंगांनी होळीचा सण साजरा केला. बालगोपाळांनी केलेल्या तुरळक पाण्याच्या वापराव्यतिरिक्त तरुणाईने कुठेही पाण्याची नासाडी होऊ दिली नाही. युवकांनी चौकाचौकात जमून डीजे व बॅण्डच्या तालावर कोरड्या रंगांची उधळण करत रंगपंचमीचा जल्लोष केला. नेहरू चौक, बळीरामपेठ, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक व एम.जे.कॉलेज परिसरात तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत तरुणाईचा हा उत्साह कायम होता. या वेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

विविध स्पर्धांनी साजरी केली होळी

‘दिव्य मराठी’च्या अभियानाला साथ देत मैढ क्षत्रिय सोनार समाज महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी ‘टिळा होळी’चा निर्धार केला होता. त्यानुसार गुलालाने टिळा लावून फुलांची होळी खेळण्यात आली. तसेच भजने सादर करण्यात आली. याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लकी ड्रॉ पद्धतीने कीर्ती अडाणिया यांची महामूर्ख म्हणून निवड करण्यात आली. यशस्वितेसाठी अध्यक्षा भगवती सोनी, सचिव रेखा वर्मा, चंद्रकला सोनी, कल्पना सोनी, नीलिमा वर्मा, पुष्पा वर्मा, कांता वर्मा, मधू वर्मा यांनी सहकार्य केले.

व्हिडिओ क्लिपद्वारे प्रबोधन

पोदार जम्बो किड्समध्ये विद्यार्थी व पालकांनी पाण्याच्या बचतीसाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली. या वेळी पालकांना ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पाण्याचे महत्त्व पटवून देणारी ‘ पानी की पहचान’ ही व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. तसेच लहान मुलांसाठी ‘पाण्याचे महत्त्व’ असा विषय असलेला पपेट शो सादर करण्यात आला. पालकांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याविषयी माहिती देण्यात आली. पाणीबचतीवरील चित्रे काढली. या वेळी मुख्याध्यापिका उमा पाटील उपस्थित होत्या.

भ्रष्टाचार, महागाई, आतंकवादाचे दहन

केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे दुष्काळ, भ्रष्टाचार, महागाई व आतंकवादाची प्रतीकात्मक होळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर अनिल वाणी उपस्थित होते. या वेळी रिद्धी वाडीकरने स्त्री-भ्रूणहत्या, स्नेहल टोकेने आतंकवाद, निखिल कासारने भ्रष्टाचार, सेजल ठाकरेने होळीचे महत्त्व या विषयावर माहिती सांगितली. धीरज जावळे याने सूत्रसंचालन केले, तर पुष्पा सुराणा यांनी आभार मानले. या वेळी सुनील माळी, डॉ.विवेक जोशी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भानुदास येवले, हृषीकेश किरंगे, आदित्य धर्माधिकारी, अलका केसकर, अजय डोहळे आदी उपस्थित होते.

वृक्षतोड थांबवण्याचे आवाहन

विद्या इंग्लिश स्कूलमध्ये महापौर किशोर पाटील यांनी उपस्थितांसह नैसíगक रंगांचा वापर करत होळी साजरी केली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि वृक्षतोड थांबवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त होळीचे महत्त्व व रासायनिक रंगांच्या दुष्परिणामाविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

अंधर्शद्धेवर व्याख्यान

मानवसेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात अंधर्शद्धा विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.एस.कट्यारे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘अंधर्शद्धा दूर करून होळीचा उत्सव कसा साजरा करावा’ याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी पाणीबचत व कोरडया रंगाच्या होळीबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. गिरीश जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर र}ा चोपडे यांनी आभार मानले.

पाणीबचत, वृक्षसंवर्धनाची शपथ

उज्ज्वल स्प्राऊटर इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी पाणीबचत व वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. तसेच रंगांची उधळण न करता झाडांना टिळा लावला. या वेळी विद्यार्थ्यांना पाणीबचतीवर प्रकल्प देण्यात आला व उत्कृष्ट प्रकल्पास 500 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले, असे यशवंत बिडये यांनी कळवले आहे.

कॉँग्रेसतर्फे पाणीबचतीचा संदेश

जळगाव जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे ‘टिळा होळी’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच याबाबत सार्‍यांनी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक एस.जयकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, अप्पर पोलिस अधीक्षक एम.अंबिका यांनी कोरड्या रंगांचा उपयोग करत ‘टिळा होळी’ साजरी करून पाणीबचतीचा संदेश दिला. याप्रसंगी राजेश कोतवाल, अरुण चांगरे, मानसिंग सोनवणे, निनाजी गायकवाड, ज्ञानेश्वर कोळी, सुनील पाटील, किरण भामरे आदी उपस्थित होते.

छायाचित्र :भोईटेनगरातील तरुणी.