आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा धाक संपला; भरदिवसा चोर्‍या, खून, हाणामारीच्या घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- हिवाळ्यात थंडीच्या कडाक्यात चोरीचे प्रमाण वाढते; मात्र यंदाचा हिवाळा चोर्‍यांसोबतच इतर गुन्ह्यांच्या वातावरणाने तापला होता. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात गुन्हे घडले आहेत. गेल्या दोन महिन्यांत 30 पेक्षा जास्त मोठे गुन्हे शहरात घडले. यात दोन खून, चार घरफोड्या, पाचपेक्षा जास्त प्राणघातक हल्ले, किरकोळ चोर्‍या, हाणामारी, वाळूचोरी आदींचा समावेश आहे. पोलिस प्रशासनाचा सर्व प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. मात्र, खुनाच्या घटनेशिवाय इतर कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या हाती लागलेले नाही. विशेष म्हणजे खुनातील आरोपी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत. एकंदरीतच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. परिणामी, शहरात केव्हाही आणि कोठेही गुन्हे करताना गुन्हेगारांना भय वाटत नाही.

नोव्हेंबर 2012 ते जानेवारी 2013 दरम्यान शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा घटनाक्रम

>9 नोव्हेंबर 2012 : रामेश्वर कॉलनीतील प्रभावती वाणी यांची सोनसाखळी ओढून चोरटे फरार.
>15 नोव्हेंबर : रामेश्वर कॉलनी परिसरात रवींद्र ठाकूर या रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला.

>3 डिसेंबर : किरकोळ वादातून अँड. सत्यजित पाटील यांना लक्ष्मण आयदासानी (जादूगार ए. लाल) यांनी लाकडी दांड्याने गंभीर जखमी केले.

>4 डिसेंबर : 1) प्रतापनगरातील डॉ.सी.जी.चौधरी यांच्या रुग्णालयाजवळून स्प्लेंडरची (एमएच 19/के 5191) चोरी. 2) प्रेयसीची छेड काढल्याच्या कारणावरून एकावर ब्लेडने वार. 3) मुंबईकडे जाणार्‍या पवन एक्स्प्रेसवर दगडफेक.

>6 डिसेंबर : 1) नेरीनाका ते बेंडाळे चौकादरम्यान असलेल्या नाल्यात स्त्री जातीचे अर्भक आढळले. 2) विद्यार्थी असल्याचे भासवून महाविद्यालयात लेर करून चाळीसगावचा चोरटा ज्ञानेश्वर पवार याला मूळजी जेठा महाविद्यालयातून अटक. त्याच्याकडून 45 हजार रुपयांचा मोबाइल हस्तगत.

>7 डिसेंबर : मायादेवी मंदिरातून चोरीस गेलेली दानपेटी रामानंदनगर रस्त्यावर आढळल्यानंतर चौकशी न करताच पोलिसांकडून दानपेटी परत.

>9 डिसेंबर : इच्छादेवी चौफुलीजवळ दुचाकी आणि कार अपघातात दुचाकी चालक गोविंद सुभाष शर्मा (रा. नशिराबाद) हा 24 वर्षीय युवक जागीच ठार. कारचालक महिला असल्याचे अनेकांनी पाहिले; मात्र पोलिस रेकॉर्डमध्ये पुरुष असल्याची नोंद.

>10 डिसेंबर : शहरातील नवीपेठ भागात नंदकुमार पवार यांच्या घरी चोरी. 6 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास.

>11 डिसेंबर : 1) किसनरावनगरमधील रुक्मिणीबाई पाटील या 62 वर्षीय महिलेची फसवणूक करून तोतया पोलिसांकडून दीड लाख रुपयांचे सोने लंपास. 2) देवेंद्रनगरातील प्रदीप चित्रकूट यांच्या घरी चोरी. 2 लाख 46 हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास.

>14 डिसेंबर : 1) रिधुरवाड्यातील प्रशांत सोनवणे खून खटल्यातील आरोपी नगरसेवक कैलास सोनवणेंसह सर्मथकांकडून न्यायालयाच्या परिसरात प्रशांत सोनवणेच्या दोन भावांना मारहाण. 2) गेंदालाल मिलमध्ये 3 दुचाकी जाळून भामटे फरार.

>18 डिसेंबर : नगरसेवक विनायक सोनवणे यांचा भररस्त्यात चाकू आणि कोयत्याने खून.

>23 डिसेंबर : 1) महाबळ परिसरातील नीलम अपार्टमेंटमध्ये चोरी. एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास. 2) शिवाजीनगर येथील लक्ष्मीनगर भागातील सुभाष आकुलकर याचा खून.

>1 जानेवारी 2013 : शिवाजीनगरमधील सेंट्रल बँकेशेजारील शिव मंदिरातील दानपेटीची चोरी.

>6 जानेवारी : सट्टापेढीवरून पैसे घेऊन पळ काढल्यावरून कालिंकामाता परिसरात भरदुपारी हाणामारी. सट्टापेढी बंद असल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरविणारी ही घटना.

>7 जानेवारी : श्रीरामनगरमधील जनाबाई इंगळे यांच्या घरात 25-30 युवकांनी घुसून सामानाची तोडफोड केली.

>8 जानेवारी : एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील वाघुळदेनगरात चोरट्यांनी डॉ.अशोक रावेरकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.