आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जॅमर’ला प्राचार्यांची ‘ना’, तर विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाविद्यालयांमध्ये मोबाइल जॅमर व डिकोडर बसवण्याची प्रक्रिया शासनातर्फे राबवण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी राज्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाध्यक्ष व सचिवांचे अभिप्राय मागवले आहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शहरातील काही महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली असता, प्राचार्यांकडून जॅमर बसवण्याबाबत ‘ना’, तर विद्यार्थी संघटनांकडून सर्मथन झाले. सर्वच विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी जॅमर बसवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर प्राचार्यांनी जॅमरची आवश्यकता नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विद्यार्थी संघटना म्हणतात..
महाविद्यालयांच्या परिसरात जॅमर बसवले पाहिजे. त्यामुळे अश्लील एमएमएस, एसएमएस यासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल. तथापि, अत्यावश्यक प्रसंगी बोलता यावे म्हणून एक जागा निश्चित करून तेथे नियम शिथिल करण्यात यावा.
-सागर रायगडे, प्रदेश सहमंत्री, अभाविप

हल्ली युवक पूर्णत: मोबाइलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जॅमरचा पर्याय योग्य ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागेल.
-मुविकोराज, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी

महाविद्यालय परिसरात 90 टक्के विद्यार्थी मोबाइलवर बोलत असतात. मोबाइलमुळे अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी मोबाइलवर बंदी आणली पाहिजे. जॅमर बसवल्यामुळे चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.
-कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजयुमो

महाविद्यालयांमध्ये घडणार्‍या अनेक दुर्दैवी प्रकारांना मोबाइलच कारणीभूत ठरतो. अश्लील एसएमएस करून विद्यार्थिनींना त्रास देण्याचे प्रकार सुरू असतात. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये जॅमर बसवले पाहिजे,
- उद्धव वाणी, उपाध्यक्ष, युवक कॉँग्रेस

काय म्हणतात प्राचार्य ?
क्लासरूम किंवा प्रयोगशाळेत जॅमर बसवणे योग्य आहे. तसेच परिसरात त्याची आवश्यकताही नाही. कारण अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी बाहेरगावाहून येतात. त्यामुळे मोबाइल हे पालक-विद्यार्थ्यांमधील संवादाचे साधन आहे.
-अनिल राव, प्राचार्य, मूजे महाविद्यालय

हल्ली मोबाइल आवश्यक वस्तू बनली आहे; परंतु त्याचा गैरवापर वाढला आहे. जॅमर बसवून मोबाइलवर बंदी आणण्याऐवजी त्यावर नियंत्रण ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे.
-डॉ.एस.एस.राणे, प्राचार्य, बेंडाळे कॉलेज

वर्गात मोबाइल वापरणे अयोग्य आहे. तसेच जॅमर बसवून बंदी आणणे म्हणजे तंत्रज्ञानाच्या नैसर्गिक वाढीला विरोध करण्यासारखे आहे. विद्यार्थी शक्यतो वर्गात मोबाइल वापरत नाहीत. त्यामुळे जॅमर बसवण्याचा निर्णय अयोग्य ठरेल.
-डॉ.विवेक काटदरे, प्राचार्य, आयएमआर

आमच्या महाविद्यालयात तीन वर्षांपासून मोबाइल वापरावर बंदी आणण्यात आली आहे. तसेच कुणाकडे मोबाइल आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
- डॉ.इकबाल शाह, प्राचार्य, थीम कॉलेज