आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jamner Congress Candidate Jyostna Vispute News In Marathi

काँग्रेस उमेदवारास कार्यकर्त्यांनीच दाखवला बाहेरचा रस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- जामनेर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच बैठकीत बाहेरचा रस्ता दाखवला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपांनी विसपुते यांना रडू कोसळले. या प्रकारानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी थेट जामनेर गाठले. तेथे कार्यकर्त्यांची मनधरणी करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

जामनेर शहरासह तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये काँग्रेसचे संपर्क कार्यालये सुरू झाले नाही. तसेच कार्यकर्त्यांना प्रचार करताना सामावून घेतले जात नाही, फोन केले तरी रीसिव्ह केले जात नाही. प्रचारासाठी वाहने नाहीत, कार्यकर्त्यांना खर्चासाठी पैसे दिले जात नाही. अशा एक ना अनेक तक्रारींनी त्रस्त होऊन मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची रविवारी भागीरथीबाई मंगल कार्यालयात बैठक झाली. बैठकीस बोलवण्यात आले नसतानाही उमेदवार विसपुते तेथे आल्या. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपांनी विसपुते यांना रडू कोसळले. बोलवले नसतानादेखील आलेल्या विसपुते यांना काही कार्यकर्त्यांनी थेट बाहेरचा रस्ता दाखवला. उमेदवाराची वागणूक पाहता काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करता समविचारी पक्षाच्या उमेदवारास पाठबळ देण्याचा तर काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी पक्षासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. या वेळी जगन्नाथ लोखंडे, शंकर राजपूत, गणेश झाल्टे, जावेद इक्बाल अब्दुल रशिद, आलीम पठाण, गफ्फार शेख, अशफाक पटेल, तौकिर फारुकी, अमृत पाटील, दिलीप गायकवाड, एम.वाय.पाटील उपस्थित होते.
पक्षांतर करून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवलेल्या डिगंबर पाटील यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यातच लोखंडेही आपल्यासोबत आहेत, अशी घोषणा दोन दिवसांपूर्वीच संजय गरूड यांनी केली होती. त्यानुसार विसपुते यांना एकटे पाडण्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याच्या भावनाही व्यक्त होते.
मला एकटे पाडण्याचा प्रयत्न
मलाएकाकी पाडण्याचा प्रयत्न असून पक्षनिधी मिळू नये, यासाठीही वरिष्ठांना फोन केले. मला कुणीही बाहेर काढले नाही. आरोप सहन झाल्याने रडू कोसळले मुलीचा साखरपुडा असल्याने बैठकीतून निघून आले.
- ज्योत्स्ना विसपुते, उमेदवार (काँग्रेस)
आम्ही काँग्रेस सोडून गेलेलो नाही, जाणारही नाही. मात्र, विसपुते यांनी उमेदवारी घेण्यापासून पोरखेळ चालवला आहे. शहरासह तालुक्यात कार्यालये नाहीत. तसेच प्रचारासाठी विसपुते खर्च करायला तयार नाहीत. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही.
-जगन्नाथ लोखंडे, माजी तालुकाध्यक्ष (काँग्रेस)