आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर नगरपालिकेच्या घरकुलविषयी खडाजंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - नगरपालिकेच्या गुरुवारच्या मासिक बैठकीत घरकुलाच्या विषयावरून नगराध्यक्ष पारस ललवाणी व विरोधी पक्षनेते महेंद्र बाविस्कर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. दरम्यान, वारंवार नोटीस बजावूनही काम न करणा-या डी.जे.पाटील अँड कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा ठराव करण्यात आला. तर सत्ताधा-यांनी भाजपच्या सत्ताकाळातील कामकाजाबाबत विशेष आॅडिट करण्याचा ठराव केला.

20 कोटी रुपये खर्चून उभा केलेला जामनेरातील घरकुलांचा डोलारा उर्वरित निधीअभावी उपयोगशून्य ठरत आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी प्रसिद्ध केलेले वृत्त पाहता ‘तीन महिन्यांत लाभार्थ्यांना घरे देऊन लाभार्थी हिस्सा म्हणून घेतलेले प्रत्येकी 1000 रुपये परत देऊ’ असे नगराध्यक्षांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. मात्र, नगराध्यक्ष शब्दाला जागले नसल्याचे आरोप विरोधी गटनेते महेंद्र बाविस्कर यांनी केले. तुमच्याच पक्षाच्या सत्ताकाळातील चुकांमुळे काम रखडल्याचा आरोप नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला. या वेळी दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. घरकुलासाठीच्या खात्यात पैसे नसताना ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत तीन कोटी रुपये शिल्लक असल्याचे सांगितल्यावरून सत्ताधारी गटाचे गटनेते रुपेश चिप्पड यांनी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना जाब विचारला.
केवळ स्पर्धेसाठी प्रभाग क्रमांक चार मधील 80 लाखांच्या कामांचे बिल घेऊन काम न करणा-या डी.जे.पाटील अँड कंपनीला वारंवार नोटीस बजावूनही उपयोग होत नसल्याने अखेर त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला; तर भाजपच्या सत्ताकाळातील कामांबाबत विशेष आॅडिट करण्याचा ठरावही बहुमताने करण्यात आला.

न्यायालयात जाण्याच्या तयारीत
जामनेरपु-यावरील घरकुलाचे दीड कोटी व बोदवड रोडवरील घरकुलांच्या मूलभूत सुविधांसाठीचे दीड कोटी रुपये शिल्लक आहेत. त्या रकमेचा विनियोग कंत्राटदाराची बाकी देण्यासाठी करता येणार नाही. मुख्याधिका-यांच्या चुकीच्या अहवालामुळे लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहत असल्यामुळे आपण स्वत:च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. रुपेशकुमार चिप्पड, सत्ताधारी गटनेता

जनतेचा केला विश्वासघात
- तीन महिन्यांत घरकुल ताब्यात देऊन लाभार्थी हिश्शाचे 10 हजार रुपये परत करण्याची फसवी घोषणा नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केली होती. वर्ष उलटूनही घरकुलाचे काम ते पूर्ण करू शकले नाहीत; त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. न.पा.फंडाची रक्कम पगार, इलेक्ट्रिक बिले भरायला कमी पडत असताना; केवळ कामांचा देखावा चालवला आहे. याप्रकरणी संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. महेंद्र बाविस्कर, विरोधी गटनेता