आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर साखर कारखाना जमीन विक्रीस परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - गेल्या 20 वर्षांपासून थडग्याप्रमाणे उभ्या असलेल्या गोंडखेल साखर कारखान्याच्या जमीन विक्रीस परवानगी मिळाली आहे. ही परवानगी पहाता सूतगिरणी, स्टार्च, रम फॅक्टरी पाठोपाठ साखर कारखानाही मोडीत निघाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पाहिलेले कारखानदारीचे स्वप्न आता पुरते भंगले आहे.

खासदार ईश्वरलाल जैन यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांना कारखानदारीचे स्वप्न दाखविले. हे स्वप्न साकार करण्यासाठी 1992 मध्ये कारखान्याची अधिकृत नोंदणी करण्यात येऊन गोंडखेल परिसरात 112 एकर जमीन खरेदी करण्यात आली. इमारतीचे काम करण्यात आले. मशीनचे काही भाग येऊन पडले. मात्र त्यानंतर या प्रकल्पाला दृष्ट लागली आणि कारखान्याचे काम थंडबस्त्यात पडले ते पुन्हा सुरू न होण्यासाठीच. गेल्या 20 वर्षात स्टार्च प्रकल्पापासून ते साखर कारखान्यापर्यंतचे अनेक प्रकल्प अनेक निवडणुकांमध्ये प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनले. पैकी सर्वाधिक गाजला तो गोंडखेल साखर कारखान्याचा मुद्दा. तत्पूर्वी स्टार्च प्रकल्प, रम फॅक्टरी हे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होऊन बंद पडले. सूत गिरणी उभारण्यापूर्वीच जमीन विक्री करण्यात आली.

भागभांडवलदारांची निराशा
कर्जस्वरूपात रक्कम घेऊन शेतकर्‍यांनी समभाग विकत घेतले. ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती अशा शेतकर्‍यांना जेडीसीसी बँकेकडून कर्ज घेऊन सोसायटीमार्फत शेअर देण्यात आले. प्रारंभी जोमाने काम सुरू झाले असले तरी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या विधानसभेतील पराभवानंतर मात्र कारखान्याचे काम थंडबस्त्यात पडले. तीन वर्षांपूर्वी जैन यांची राज्यसभेवर तर त्यांचे पुत्र मनीष जैन यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. दोघा पितापुत्रांची निवड पहाता तालुकावासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र साखर कारखाना सुरू करण्याबाबत न झालेल्या कोणत्याही हालचाली पाहता पल्लवित झालेल्या आशा पुन्हा मावळल्या.

तर स्वप्न होणार साकार
सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू होऊ शकणार नाही, हे जमीन विक्रीला मिळालेल्या परवानगीवरून स्पष्ट होते. थोड्याच अंतरावर असलेली चार मोठी धरणे व जळगाव-औरंगाबाद महामार्गापासून चार कि.मी. अंतरावर एकाच जागी असलेली 112 एकर जमीन पाहता मोठय़ा उद्योगाने ही जागा विकत घेतल्यास एखादा मोठा उद्योग या जागी उभा राहू शकतो. त्यामुळे रोजगारासह परिसराच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते.

एम.डी.नी दिला दुजोरा
साखर कारखान्याची जमीन विक्री करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज संचालक मंडळाने राज्याचे सहकार, साखर आयुक्त यांच्याकडे केला होता. त्यानुसार साखर कारखान्याची 112 एकर जमीन विक्रीची परवानगी मिळाली आहे. याबाबत कारखान्याचे एम.डीं.कडे खात्री केली असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला, मात्र तिथे असलेले शेड व अन्य साहित्यामुळे तूर्त तरी जमीन विक्रीचा विषय नसल्याचे एम.डी. एच.जे.काळे यांनी स्पष्ट केले.

साखर कारखाना झाल्यानंतर मुलांसह परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. उसाची लागवड वाढून चांगला भाव मिळाल्याने शेतकर्‍यांची प्रगती होईल, या आशेवर 2700 रुपये कपात करून देत सोसायटीमार्फत शेअर्स घेतले आहे. मात्र सारेच स्वप्न खोटे ठरले. रामचंद्र तेली, भागभांडवलदार शेतकरी