आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जामनेर तालुक्यात पाणी ‘पेटले’; गोंडखेळ धरणातील जलसाठा संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - तालुक्यातील धरणांतून पाणी सोडण्यावरून वाद उद्भवू लागले असून जणू पाणी ‘पेटले’ आहे. गोंडखेळ ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी शुक्रवारी पाळधी साठवण तलावाची पाहणी केली. तहसीलदार आल्याची माहिती मिळताच पाळधी ग्रामस्थांनी तलावावर येऊन पाणी सोडण्यास विरोध केला.
गोंडखेळ गावालगत असलेल्या धरणाच्या खाली गोंडखेळ ग्रामपंचायतीची विहीर आहे. या विहिरीतून गोंडखेळला पाणीपुरवठा होतो. मात्र, या विहिरीला गोंडखेळ 1 या धरणातून पाझर असून धरणातील पाणी संपुष्टात आले आहे. त्यामुळे गोंडखेळ गावाच्या पाण्याची समस्या गंभीर होणार असून उपाय म्हणून पाळधी साठवण तलावातील पाणी गोंडखेळ 1 धरणात सोडले जावे, अशी मागणी करून त्यासाठीची शासकीय फी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरली आहे. गोंडखेळ ग्रामपंचायतीच्या अर्जानुसार प्रांताधिकार्‍यांनी तहसीलदार व पंचायत समितीचा संयुक्त अहवाल मागवला आहे. त्यासाठी शुक्रवारी तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, तलाठी कापसे, पंचायत समितीचे संबंधित विभागप्रमुख डी.के.बोरोले यांनी शुक्रवारी पाळधी पाझर तलावाची पाहणी केली. या वेळी गोंडखेळ येथील पंढरी वाघ, जयराम पाटील व काही ग्रामस्थ उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा
वाघ यांनी गोंडखेळ व पाळधी साठवण तलाव शासनाकडून मत्स्य व्यवसायासाठी घेतले आहेत. पाळधी पाझर तलावातून पाणी सोडल्यास दोन वर्षांपासून जमा झालेले मोठे व चांगले मासे कमी झालेल्या पाण्यात पकडण्यास सोपे जातील. गोंडखेळ धरणातील माशांना जीवदान मिळेल, यासाठी वाघ हे गावाच्या नावाखाली राजकारण करीत असल्याचा आरोप पाळधी ग्रामस्थांनी केला आहे. या पाझर तलावावरून टंचाई काळात तालुक्यातील 40 पेक्षा जास्त खेड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला होता. वैयक्तिक स्वार्थासाठी पाणी सोडू देणार नसल्याचे सांगून पाणी सोडण्याचा प्रयत्न झाल्यास पाळधी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही तहसीलदार देवगुणे यांना दिला आहे. दरम्यान, आपल्यावर पाळधी ग्रामस्थांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे पंढरी वाघ यांनी या वेळी नमूद केले.
वाघारी, पाटखेड्यातील प्रश्न
वाघारी, पाटखेडा गावाची पाणीसमस्या गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून सूर धरणातून नदीमार्गे पाणी सोडावे, अशी मागणी वाघारी पाटखेडा ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसीलदार व पंचायत समितीचा संयुक्त अहवाल मागवला होता. मात्र, नदीपात्रातून पाणी सोडल्यास शेतकरी उचल करतील, बहुतांश पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि पाणी सोडूनही पाणीटंचाई कायमच राहील, असा युक्तिवाद काही नागरिकांनी तहसीलदारांकडे केला आहे.
कमानी तांडा प्रकल्पातील पाळधी साठवण तलाव हा शेवटचा तलाव आहे. दरवर्षी अधिकारी, पदाधिकार्‍यांशी वाद घालून पाळधी ग्रामस्थ कॅनॉलमार्गे हा तलाव भरून घेतात. पंढरी वाघ हे स्वत:च्या मत्स्य व्यवसायासाठी पाणीटंचाईचे कारण पुढे करीत आहेत. तलावातून नदीमार्गे पाणी मुळीच सोडू देणार नाही. वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
अनिल पाटील, उपसरपंच पाळधी.